esakal | NDA : चला, संधीचे करू सोने; ‘एनडीए’च्या परीक्षेची मुलींनी सुरू केली तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

चला, संधीचे करू सोने; ‘एनडीए’च्या परीक्षेची मुलींनी सुरू केली तयारी

चला, संधीचे करू सोने; 'NDA’च्या परीक्षेची मुलींनी सुरू केली तयारी

sakal_logo
By
अक्षता पवार - सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुलींनाही लष्करात संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयाने याचवर्षी होणाऱ्या एनडीए आणि नौदल ॲकॅडमी परिक्षेत बसण्याची परवानगी दिली आहे. परवानगी दिल्यानंतर अवघ्या महिनाभरात राष्ट्रीय स्तरावरील परिक्षेची तयारी मुलींनी सुरू केली आहे. अल्पावधीत मुली या परिक्षेचे आव्हान कसे पेलणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

आत्तापर्यंत यूपीएससीमार्फत केवळ मुलांसाठी वर्षातून दोनवेळा एनडीए व नौदल ॲकॅडमीसाठीची प्रवेश परीक्षा घेण्यात येते होती. मे २०२२ मध्ये मुलींना ही परीक्षा देता येईल असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मुलींना याच वर्षी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. या बाबत राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या डॉ. सुलभा विधाते यांनी सांगितले, ‘‘सैनिकी शाळेत सहावीपासूनच मुलींना लष्करातील विविध संधींसाठी तयार केले जाते. परंतु यापूर्वी मुलांप्रमाणे मुलींना सैनिकी शाळेतून बारावीनंतर लष्करासाठी कोणतेच पर्याय नव्हते. एनडीएमध्ये मुलींना प्रवेश मिळत असल्याने प्रथमच मुलींना बारावीनंतर अधिकारी म्हणून लष्करात जाण्याची संधी मिळत आहे.

येथे करता येईल अर्ज...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने ‘एनडीए’ आणि नौदल ॲकॅडमीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया केवळ मुलींसाठी सुरू करण्यात आली असून या प्रवेश प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना येत्या आठ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी व याबाबतच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.

  • लेखी परीक्षा दोन भागांत होते

  • परीक्षांमध्ये बहुपर्यायी प्रश्‍न असतील

  • यूपीएससीच्या संकेतस्थळावर परीक्षेशी संबंधित अभ्यासक्रम, स्वरूपाबाबत माहिती

  • त्यानुसार इतर मुलींना तयारी करता येईल

एनडीए प्रवेश प्रक्रियेसाठी साधारणपणे सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने मुलींसाठी राहण्याची, प्रशिक्षणासाठी महिला प्रशिक्षक व इतर सुविधा उभारण्याकरिता एनडीए प्रशासनाकडे पुरेसा वेळ आहे. दरम्यान, ही परीक्षा उत्तीर्ण करून किती मुली एनडीएत प्रवेश मिळवतात, यावर सोयीसुविधांच्या उभारणीचा प्रश्‍न अवलंबून आहे. त्यामुळे आता महिला उमेदवारांना संरक्षण क्षेत्रात कायमस्वरूपी आयोग (पर्मनंट कमिशन) मिळेल.

- लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर

घरात लष्कराची पार्श्‍वभूमी असल्यामुळे लहानपणापासूनच लष्करात जाण्याचे स्वप्न होते. एनडीएचा पर्याय निर्माण झाल्यामुळे पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परिक्षेसाठी मी तयारी करत आहे. एनडीएतून प्रशिक्षण घेऊन मला सैन्यदलात जाण्याची इच्छा आहे.

- श्रद्धा काळे, उमेदवार

loading image
go to top