
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ‘महिलांना घरांच्या मालक बनवा, अन मालमत्ताकरात सवलत मिळवा,’ अशी घोषणा केली होती.
Womens Day Special : घर नावावर; पुण्यातील आठ लाख महिला ‘मालक’
पुणे - ग्रामीण भागातील महिलांना घरांची कायदेशीर मालकी देण्याची मोहीम पुणे जिल्हा परिषदेने सुरू केली आणि अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील ८ लाख १५ हजार ५७३ महिला आपापल्या घरांच्या कायदेशीर मालक बनल्या. जिल्ह्यातील अधिकाधिक घरांवर महिलांची मालकी व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेने मिळकतकरात खास सूट दिली आणि या सवलतीचा फायदा होण्याचा देशातील पहिला प्रयोग यशस्वी झाला.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ‘महिलांना घरांच्या मालक बनवा, अन मालमत्ताकरात सवलत मिळवा,’ अशी घोषणा केली होती. त्यानंतर महिलांच्या नावे घरे करण्यासाठी गेल्या वर्षीच्या जागतिक महिलादिन (८ मार्च २०२२) ग्रामस्थांमध्ये खास ठराव मंजूर केले होते. गावा-गावांतील घरांच्या सातबारा उताऱ्यावर महिलांचे नाव नोंदविणे, याच्या माध्यमातून महिलांना घरांची मालकी देणे आणि मिळकतीत पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही समान हक्क मिळावा, असा तिहेरी उद्देश या उपक्रमाच्या अंमलबजावणीमागे जिल्हा परिषदेने ठेवला होता.
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गावातील मिळकतींसाठी (मालमत्ता) महाफेरफार मोहीम राबविली. त्यात सहा लाख ४२ हजार ८६ घरांचा सातबारा उतारा आणि आठ अ उताऱ्यांवर महिलांच्या नावांची नोंद करण्यात आली. या मोहिमेनंतर गेल्या वर्षभरात त्यात आणखी एक लाख ७३ हजार ५८७ घरांची भर पडली.
जिल्ह्यातील गावा-गावांतील महिलांना घरांची मालकी मिळावी, यासाठी प्रॉपर्टी कार्डवर महिलांचे नाव नोंदविणे, त्याचे वितरण करणे, काही गावांमध्ये अद्ययावत प्रॉपर्टी कार्डचे वाटप करणे आदी बाबींवर गेल्या वर्षभरात विशेष भर दिला आहे.
- सचिन घाडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग
महिलांच्या नावे घरांची सद्य:स्थिती
८९ टक्के महिलांच्या नावे घरांच्या मालकीचे प्रमाण
९,२७,७०६ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कुटुंबांची संख्या
११ टक्के घरांवर महिलांची मालकी नसल्याचे प्रमाण
८,१५,५७३ घरांची मालकी महिलांच्या नावे झालेली कुटुंबे
१,१२,१३३ महिलांची मालकी नसलेली घरे
महिलांमुळे अशी मिळाली मालमत्ताकरात सवलत
पती-पत्नी व सून आदींच्या संयुक्त नावावरील घरे : ३ टक्के
अठरा वर्षे पूर्ण असलेल्या अविवाहित मुलींच्या नावावर घर करणे : ५ टक्के
फक्त महिलांच्या नावे घर करणे : ७ टक्के
उद्योगामध्ये महिलांची ८० टक्के भागीदारी असलेल्या मिळकती : ७ टक्के
पतीचे निधन झालेल्या महिला आणि तिच्या मुलींच्या नावे घर : १० टक्के