Women's Day :  चित्रांमधली जुगलबंदी साधणाऱ्या मैत्रिणी

नीला शर्मा
सोमवार, 9 मार्च 2020

मंजिरी मोरे व स्नेहल पागे या दोघींना शब्दांपेक्षा चित्रांमधून संवाद साधायला आवडतो. मंजिरीताईंचा हातखंडा विषय व्यक्तिचित्र हा, तर स्नेहलच्या हातून वास्तववादी चित्रं सफाईनं उतरतात. गंमत अशी, की दोघींनी पानगळीतलं निसर्गसौंदर्य शोधणारी चित्रं स्वतंत्रपणे तयार केली आहेत. यातली जुगलबंदी नुकतीच एका प्रदर्शनातून रसिकांनी अनुभवली आणि याची बातमी झपाट्यानं पसरत गेली. 

शिशिर ऋतूतील पानगळीचं वर्णन मंजिरी मोरे आणि स्नेहल पागे यांनी आपल्या ‘शिशिरागमे’ या अलीकडेच पुण्यात झालेल्या प्रदर्शनात फार रोचकपणे केलं होतं. यात दोघींनी चित्रांमधून शिशिराच्या अंतरंगाचा वेध तर घेतलेला होताच; शिवाय नामवंत कवींच्या या आशयाला गडद करणाऱ्या कवितांची मांडणी भारावून टाकत होती. गळणाऱ्या पानांचे वेगवेगळे आकार व लाल, पिवळ्या, मातकट, नारिंगी, करड्या रंगछटा आसमंत व्यापून राहतात. यातलं एखादंच पान किंवा त्यांचा समूह या दोघींनी चित्रबद्ध केला होता. भांडारकर रस्त्यावरील आर्ट टुडे गॅलरीत आठवडाभर चाललेल्या प्रदर्शनात मंजिरीताई व स्नेहल प्रात्यक्षिक दाखवायच्या. सहज झाडापासून दूर होत मजेत तरंगत भुईवर झेपावणाऱ्या पानांचा गालिचा म्हणा किंवा पाचोळ्याचं मातीशी एकरूप होऊन निसर्गचक्रातील अन्नसाखळीत विलीन होणं म्हणा, काहींना या चित्रांमधील गूढता वेधून गेली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मंजिरीताई म्हणाल्या, ‘चित्रकलेबरोबरच इंटेरिअर डिझाइन हाही माझ्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. मुंबईत शिक्षण झालं. पुण्यात तीस वर्षांपासून वास्तव्य आहे. यापूर्वीही कधी एकल तर कधी दोघी, तिघी किंवा चौघी मिळून आयोजित केलेल्या प्रदर्शनामध्ये मी सहभागी झाले. पण, या वेळी स्नेहल आणि माझ्या चित्रांमधला संवाद रसिकांना भरभरून जाणवला. आमची जुनी ओळख असली, आम्ही यापूर्वी एकत्रितपणे काम  केलं असलं, कार्यशाळांमध्ये सोबत राहिलो असलो; तरी शिशिरातल्या पानगळीचा आम्ही आपापल्या परीनं चित्रांमधून वेध घेत असल्याचं एकमेकींना ठाऊक नव्हतं. एखादा राग दोन वेगवेगळे गायक आपापल्या पद्धतीनं गातात, तसंच काहीसं वाटलं. मग प्रदर्शनासाठी हा विषय पक्का केल्यावर आम्ही आणखी थोडी चित्रं काढली. यातून शिशिराबद्दल चित्रांमधून जुगलबंदी आळवण्याची अनुभूती आल्याचं काही जणांनी सांगितलं.’

स्नेहलनं सांगितलं की, उपयोजित चित्रकलेप्रमाणेच प्राच्यविद्येचा अभ्यास मला भुरळ पाडणारा ठरला. वास्तववादी चित्रकलेचा आणखी जास्त अभ्यास मी अमेरिकेत केला. संपूर्ण आकारातील व्यक्तिचित्रांबरोबरच स्थिरचित्रं काढण्यात मी रमते. बोरकर, मर्ढेकर, गोविंदाग्रज यांच्यासारख्या कवींच्या रचनांमधील झाडा-पानांची वर्णनं मला अतिशय चित्रमय वाटत आली आहेत. कवितेत चित्रमयता व चित्रांत काव्यात्मकता अशा काहीशा संमिश्र मनोवस्थेत ही चित्रं केली गेली. मंजिरीताईंच्या याच विषयावरच्या कलाकृती पाहिल्या आणि आपल्यालाही हेच कसं सुचलं, याची मौजही वाटली. शिशिरातल्या पानगळीची आम्हाला स्वतंत्रपणे जाणवलेली रूपं चित्रांच्या एकत्र मांडणीतून बघणाऱ्यांसाठी वेगळाच परिणाम साधून गेली. ही चित्रं काढताना निसर्ग सान्निध्यात अपूर्व शांतता अनुभवली. त्यातूनच वाटून गेलं, ‘मनी रानभूल पडे/ नक्षी भाबडी उमटे/ पाचोळ्याची/ अंतरीचे गूज अंतरासी गमे / दाद कौतुकाची मिळे, रसिकांची.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Womens Day special story Manjiri more and snehal page