esakal | लाकडी निंबोडी उपसा जल सिंचन योजनेला मिळणार गती; उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूर तालुक्यातील ही आठ गावे काही अंशी खडकवासला व नीरा डावा कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिली होती. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांनी शेती सिंचनासाठी या योजनेची मागणी श्री भरणे यांच्याकडे केली होती. यावर  सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन श्री भरणे यांनी शेतकऱ्यांना दिले होते. अखेरीस महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच भरणे यांनी या योजनेसाठी पाठपुराव्याला सुरुवात केली आहे.

लाकडी निंबोडी उपसा जल सिंचन योजनेला मिळणार गती; उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा पुढाकार

sakal_logo
By
विनायक चांदगुडे

शेटफळगढे (पुणे ) : गेल्या पंचवीस वर्षापासून इंदापूर तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत चर्चेत येणाऱ्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेच्या कामाला आता खऱ्या अर्थाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून गती मिळणार आहे. बारामती व इंदापूर तालुक्यातील 15 गावांचे या योजनेकरीता येत्या साडे तीन महिन्यात सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणानंतर याबाबतचा अहवाल प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे. याचा दोन्ही तालुक्यातील 7 हजार 400 हेक्टर क्षेत्राला शेती सिंचनासाठी फायदा होणार आहे.

इंदापूर तालुक्यातील ही आठ गावे काही अंशी खडकवासला व नीरा डावा कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिली होती. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांनी शेती सिंचनासाठी या योजनेची मागणी श्री भरणे यांच्याकडे केली होती. यावर  सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन श्री भरणे यांनी शेतकऱ्यांना दिले होते. अखेरीस महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच भरणे यांनी या योजनेसाठी पाठपुराव्याला सुरुवात केली आहे.

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत या योजने बाबतच्या दोन बैठका मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील व भरणे यांच्या उपस्थितीत मागील दोन महिन्यात पार पडल्या आहेत. त्याचेच फलित म्हणून या योजनेच्या सर्वेक्षणासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कमी खर्चात जास्तीत जास्त हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी कोणत्या पर्यायाचा स्वीकार करायचा. यावर विचार केला जाणार आहे. मात्र 1995 पासून प्रत्येक निवडणुकीत चर्चेला येणाऱ्या योजनेला खऱ्या अर्थाने  गती मिळणार असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष या योजनेकडे लागले आहे.

योजनेचे स्वरुप 

(1) उजनी जलाशयातून कुंभारगाव गावाजवळून पाणी उचलून पोंधवडी लघुपाटबंधारे तलावात टाकले जाणार 
(2) पोंधवडी तलावातून पुन्हा पाणी उचलून लामजेवाडीच्या खालील बाजूस सोडले जाणार 
(3) दीड हजार मिमी व्यासाच्या पाइपचा वापर केला जाणार 
(4) लामजेवाडी येथून बंद नलिकेद्वारे शेतीपर्यंत पाणी पोहोचविले जाणार
(5) इंदापूर तालुक्यातील आठ गावातील 4 हजार 647 हेक्टर व बारामती तालुक्यातील 7 गावातील 2 हजार 753 हेक्टर असे दोन्ही तालुक्यातील पंधरा गावांचे एकूण मिळून 7 हजार 400 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार

योजनेत समाविष्ट गावे

(1) इंदापूर तालुका- ( 8 गावे) लाकडी, निंबोडी, काझड, लामजेवाडी ,म्हसोबाचीवाडी, शेटफळगढे, निरगुडे, शिंदेवाडी
(2) बारामती तालुका- (7 गावे) जैनकवाडी, पारवडी रुई, सावळ, वंजारवाडी, कन्हेरी, जळोची

 योजनेच्या सर्वेक्षणाबाबत व प्रशासकीय मंजुरी बाबत

(1) योजनेच्या ड्रोनद्वारे सर्वेक्षणासाठी २२ ऑक्टोबर ते ०५ नोव्हेंबर २०२०  या कालावधीत निविदा मागविण्यात आल्या आहेत.
(2)  73 लाख 48 हजार 935 रुपयांचा खर्च होणार
(3) आगामी १५ दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार
(4) आगामी तीन महिन्यात योजनेचे सर्वेक्षण करण्याचे संबंधितांवर बंधन
(5) सर्वेक्षणाची माहिती प्राप्त झाल्यानंतर याबाबतचा अहवाल तयार करून तो पुणे येथील राज्यस्तरीय सल्लागार समितीकडे तपासणीसाठी पाठविला जाणार 
(6) समितीच्या अभिप्रायासह योजनेचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर केला जाणार

संपादन - सुस्मिता वडतिले