धर्माचे काम माणसाला माणूस बनवणे; गौर गोपाल दास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

work of religion is to make man human Gaur Gopal Das pune

धर्माचे काम माणसाला माणूस बनवणे; गौर गोपाल दास

पुणे : ‘‘माझ्यासाठी सर्वात प्रथम धर्म जैन, हिंदू, वैष्णव नसून मानवधर्म आहे. मनुष्य घराघरांत जन्मास येतात पण मानवधर्म काहीच ठिकाणी दिसून येतो. धर्माचे काम हिंसा नसून माणसाला माणूस बनवणे आहे. कोणताही सनातन धर्म मानवतेचे काम करत असेल, तर त्याला माझे वंदन आहे. मी देशाचा प्रथम नागरिक असून त्यानंतर मी कोणत्याही जाती धर्माचा आहे. त्यामुळे कोणत्याही अभिवादना पूर्वी वंदे मातरम हे सर्वात आधी आपल्या मुखात असले पाहिजे,’’ असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते ( मोटिवेशनल स्पीकर) गौर गोपाल दास यांनी केले.

गंगाधम ते कात्रज कोंढवा रस्त्यावर वर्धमान लॉन्ससमोर आयोजित केलेल्या ‘जीतो कनेक्ट’ परिषदेत ते बोलत होते. जीतो अॅपेक्सचे चेअरमन गणपतराज चौधरी, व्हाईस चेअरमन विजय भंडारी, अध्यक्ष सुरेश मुथा, जीतो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, जीतो कनेक्टचे मुख्य प्रायोजक विनोद मांडोत, कांतिलाल ओसवाल, पंकज कर्नावट, चेतन भंडारी, धीरज छाजेड, इंदर छाजेड, रमेश गांधी, इंदर जैन, अजय मेहता, उद्योजक नरेंद्र बलदोटा, विशाल चोरडिया, खुशाली चोरडिया, लकिशा मर्लेचा, गौरव नहार, प्रीतेश मुनोत आदी उपस्थित होते.

दास म्हणाले, ‘‘जीवनात मोठी स्वप्ने पाहिली, तरच आपण प्रगती करू शकतो. कामावर लक्ष्य देवून अथक प्रयत्न केले, तर प्रगती होऊ शकते. रात्र स्वप्न पाहण्यासाठी असते आणि दिवस स्वप्न पूर्ण करण्यासाठी असतात. दुसऱ्याच्या जीवनावर लक्ष्य केंद्रित करण्यापेक्षा स्वत:च्या जीवनावर लक्ष्य केंद्रित करणे आवश्यक आहे. जीवनात दररोज अनेक अडचणी सर्वांना येतात आणि सुख, दुःख यांचा चढ-उतार कायम सुरू असतो. मात्र, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जीवनात आत्मविश्वास कायम राहिला पाहिजे.’’

भंडारी म्हणाले, ‘‘जगभरात आपण सेवा माध्यमातून काम करत आहोत. कोरोना काळात पंतप्रधान रिलिफ फंडमध्ये २८० कोटीपेक्षा अधिक रुपये मदतीसाठी देण्यात आले आहेत. गृह प्रकल्पासाठी सहकार्य करून जीतोनगरमध्ये ४३६ घरे निर्माण करण्यात आली असून ती समाज बांधवांना देण्यात येणार आहेत. अशाप्रकारे देशभरात एकूण चार हजार घरे जीतोनगरद्वारे बेघर समाज बांधवांना हस्तांतरित करण्यात येत आहेत. अधिकाधिक लोकांनी या कामात सहभागी होऊन आर्थिक मदत केली पाहिजे.’’ रांका म्हणाले, ‘‘जीतो कानेक्टचे पुण्यात यशस्वी आयोजन सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून करण्यात आले आहे. त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.’’

गौर गोपालदास म्हणाले...

  • इतरांशी तुलना करून द्वेष भावना वाढविण्यापेक्षा स्वतःजवळ असलेल्या सुख सोयींमध्ये आनंद शोधा.

  • करिअर काळजीपूर्वक निवडा.

  • यशाचे शिखर चढताना परिवार आणि मित्रांना दुखवू नका.

  • कामाचे समाधान, लोकांना मदत करणे, एकत्रित काम करणे ही यशाची गुरुकिल्ली.

  • मोठे होत असताना समाधानी असणे महत्त्वाचे

  • आयुष्य मर्यादित असून आपण नातेसंबंध, आरोग्य, मित्र-नातेवाईक यांना न विसरता सुखाने आयुष्य जगावे.

  • स्वतःच्या विकासासाठी जिद्दीने प्रयत्न करा

  • जीवनात आत्मविश्वास कायम ठेवा

  • आपल्यातील चुका शोधण्यास दुसरे लोक आहेत, आपण आपली शक्तिस्थळे शोधली पाहिजेत.

जीवनात मृत्यू एकदा मिळतो, पण जीवन हे दररोज नव्याने मिळत असते. केवळ पैसा असून उपयोग नाही. कारण समाधान नसेल, तर जीवनात आनंद मिळू शकत नाही. आलिशान घरापेक्षा घराच्या आतील नाती सुख देतात. महागडा मोबाईल सुख नाही देत, तर त्यावर साधला जाणारा संवाद समाधान देतो. खूष राहण्याची जबाबदारी कोणा दुसऱ्याची नाही, तर ती स्वतःची आहे. आपल्या विकासासाठी आपण जिद्दीने प्रयत्न केले पाहिजे.

-गौर गोपाल दास, मोटिवेशनल स्पीकर

Web Title: Work Of Religion Is To Make Man Human Gaur Gopal Das Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top