आईच्या उदरातून मधुमेहाची सुरवात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 November 2019

हा आजार शहरातील श्रीमंत आणि लठ्ठ माणसांचा असल्याची भावना आतापर्यंत समाजात रूढ झालेली दिसते. पण, या संशोधनातून मधुमेह हा फक्त शहरापुरता आणि लठ्ठ माणसांपुरता मर्यादित राहिला नसल्याचे स्पष्ट झाले.

पुणे - आपल्या देशात मधुमेहाची सुरवात मुळातच आईच्या उदरातून होते, त्यामुळे वयाची अठरा वर्षे होईपर्यंत सडपातळ दिसणाऱ्या तरुणांमध्येही मधुमेहाची स्पष्ट लक्षणे दिसून येतात. त्यामागे गर्भावस्थेत पोषक आहाराचा अभाव हे प्रमुख कारण असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. 

केईएम रुग्णालयातील मधुमेह विभागात गेल्या तीस वर्षांपासून सुरू असलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष निघाला आहे, अशी माहिती विभागाचे प्रमुख डॉ. चित्तरंजन याज्ञिक यांनी जागतिक मधुमेह दिनानिमित्त ‘सकाळ’शी बोलताना दिली. हा आजार शहरातील श्रीमंत आणि लठ्ठ माणसांचा असल्याची भावना आतापर्यंत समाजात रूढ झालेली दिसते. पण, या संशोधनातून मधुमेह हा फक्त शहरापुरता आणि लठ्ठ माणसांपुरता मर्यादित राहिला नसल्याचे स्पष्ट झाले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

याबाबत डॉ. याज्ञिक म्हणाले, ‘‘गर्भाशयात असल्यापासून मधुमेहाची सुरवात होत असल्याचे संशोधनातून दिसून आले. त्याचे मुख्य कारण योग्य पोषक आहार नसणे हे आहे. याचा थेट परिणाम फक्त मधुमेह होण्यावर होतो असे नाही, तर गर्भाशयातच विकसित होणाऱ्या यकृत आणि मूत्रपिंडावरदेखील होत असल्याचे दिसून आले आहे. अशा बाळाला जन्मानंतर भविष्यात मधुमेहाचा धोका कायम असतो. तसेच, उच्च रक्तदाबही होण्याची शक्‍यता असते.’’ 

गर्भावस्थेतील मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे लहान मुलांमधील म्हणजे अगदी १५ वर्षांच्या आतील मुलांमध्येही स्थूलता आणि मधुमेहाचे निदान होताना दिसत आहे. यावरून गर्भावस्थेतील पोषक आहार महत्त्वाचा असतो. गर्भावस्थेतील मधुमेहात गर्भाचा विकास होत असताना झालेले कुपोषण, तसेच त्याचे अतिपोषण हेदेखील तितकेच धोक्‍याचे असते. त्याचा थेट दुष्परिणाम त्याच्या सर्वांगीण विकासावर तर होतोच; पण त्यातून मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांचा भविष्यात धोका असल्याचेही त्यांनी सांगितले. 

गुगलने साकारले बालदिनानिमित्त विशेष डुडल

काय करावे?
‘‘भविष्यातील पिढी सुदृढ ठेवण्यासाठी आताच्या तरुण- तरुणींनी स्वतःचे आरोग्य निरोगी आणि सशक्त ठेवणे आवश्‍यक आहे. तसे झाले तरच भविष्यातील मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका आपण कमी करू शकतो,’’ असे डॉ. चित्तरंजन याज्ञिक यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Diabetes Day Special story

Tags
टॉपिकस
Topic Tags: