

मुगाव येथे ‘जागतिक
गर्दभ दिन’ उत्साहात साजरा
५० गाढवांची आरोग्य तपासणी; उपचार, हेड कॉलर व खाद्य वितरण
ऍग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील ‘धर्मा डॉंकी सेंचुअरी’ संस्थेतर्फे शुक्रवारी (ता. ८) नायगाव तालुक्यातील मुगाव येथे ‘जागतिक गर्दभ दिन’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ५० गाढवांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच प्रत्येक गाढवाला हेड कॉलर लावून खाद्यही देण्यात आले.
अत्यंत कष्टाळू, संयमी आणि ग्रामीण जीवनातील वाहतूक व श्रम व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या गाढव या प्राण्याबद्दल समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण व्हावी, त्यांच्याप्रती सन्मानाची भावना वाढावी तसेच त्यांच्या आरोग्य, संवर्धन व संरक्षणाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी ‘जागतिक गर्दभ दिन’ साजरा केला जातो. दुर्लक्षित आणि अनेकदा उपेक्षित राहिलेल्या या प्राण्यांच्या कल्याणासाठी समाजाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज असल्याचे संस्थेचे विश्वस्त अभिजित महाजन यांनी यावेळी सांगितले. ‘धर्मा डॉंकी सेंचुअरी’ संस्थेतर्फे मागील पंचवीस वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील जवळपास दीड हजार गाढवांच्या आरोग्याची सातत्याने काळजी घेतली जात आहे. संस्थेमार्फत गाढवांची आरोग्य तपासणी, औषधोपचार, पशुपालकांमध्ये जनजागृती, गाढव पालक व पशुवैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना प्रशिक्षण आदी विविध उपक्रम राबविले जातात. याशिवाय गाढवांच्या आरोग्य व संगोपनाबाबत ग्रामीण भागात विशेष मोहीमही चालविली जाते. दरवर्षी संस्थेतर्फे ‘जागतिक गर्दभ दिन’ वेगवेगळ्या गावांमध्ये साजरा करण्यात येतो. गतवर्षी हा उपक्रम आळंदी (ता. बिलोली) येथे पार पडला होता. तसेच ‘सुदृढ व देखणा गाढव’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याने पशुपालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते. यावर्षी मुगाव येथे झालेल्या कार्यक्रमात गाढवांप्रती जिव्हाळा, माया आणि संवेदनशीलता जपणारे उपक्रम राबविल्याबद्दल पशुपालकांनी समाधान व्यक्त केले. पशुवैद्यक निहाल मुल्ला, भास्कर बुच्छलवार यांनी तपासणी करून औषधोपचार केले. अनन्यकश्यप प्रभाकर राव यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास परिसरातील पशुपालक उपस्थित होते.
----
फोटोओळ :
नांदेड : मुगाव (ता. नायगाव) येथे ‘जागतिक गर्दभ दिनानिमित्त धर्मा डॉंकी सेंचुअरीकडून गाढवांची आरोग्य तपासणी, हेड कॉलर व खाद्य वितरण केले.