esakal | जागतिक हृदय दिवस : हृदयाशी व्हा ‘डिजिटली कनेक्ट’। World Heart Day 2021
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक हृदय दिवस : हृदयाशी व्हा ‘डिजिटली कनेक्ट’

जागतिक हृदय दिवस : हृदयाशी व्हा ‘डिजिटली कनेक्ट’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील एक तरुण ‘रिव्हर राफ्टिंग’साठी उत्तराखंडमध्ये गेला होता. अचानक त्याला हृदयाचा त्रास जाणवू लागला. हृदयातील ठोक्यांत बदल झाले. त्या क्षणाला त्याच्या ‘स्मार्ट फोन’ने ही माहिती ‘इमर्जन्सी’साठी सेव्ह केलेल्या डॉक्टरांकडे पाठविली. डॉक्टरांनी त्याच्या मोबाईलवर फोन केला. तेथील वैद्यकीय पथकातील डॉक्टरांच्या मदतीने त्याला तातडीने उपचार मिळाले.

अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित ‘डिजिटल कनेक्ट’मुळे त्या तरुणाचे प्राण वाचविणे डॉक्टरांना शक्य झाले. जागतिक हृदयदिन बुधवारी (ता. २९) साजरा होतो आहे. ‘यूज हार्ट टू कनेक्ट’ ही यंदाच्या हृदयदिनाची संकल्पना आहे. त्यानिमित्ताने हृदयाच्या विविध चाचण्यांच्या आधारावर हृदयरोग तज्ज्ञांना ‘डिजिटल’ वैद्यकीय सल्ला देणे शक्य होत असल्याचे दिसते.

हृदयाच्या आरोग्याची डिजिटल तपासणी

रिमोट मॉनिटरिंग

इलेक्ट्रेगार्डिओग्राम (ईसीजी), रक्तातील प्राणवायूचे प्रमाण, हृदयाच्या ठोक्यांची गती याची माहिती आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध होते. या पायाभूत माहितीच्या आधारावर हृदयरोग तज्ज्ञांशी रुग्ण संवाद साधू शकतो.

व्हिडिओ कॉलवरून सल्ला

डॉक्टरांनी रुग्णाला हात लावून तपासणे महत्त्वाचे आहेच. पण, आता कोरोना उद्रेकात व्हिडिओ कॉलवरून वैद्यकीय सल्ला दिला जातो. विशेषतः पाठपुराव्यासाठी (फॉलोअप) क्लिनिकला येणाऱ्या रुग्णांसाठी हा पर्याय खुला झाला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता

(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) : हृदयाच्या आरोग्याच्या काही निकषांची माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने आपल्याला मिळते. ही माहिती वेगवेगळे अॅप, स्मार्ट फोनच्या माध्यमातून डॉक्टरांपर्यंत पोचविता येते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सांभाळण्यासाठी ‘डिजिटल हार्ट हेल्थ’ उपयुक्त ठरत असल्याचा विश्वास विविध हृदयरोग तज्ज्ञांनी व्यक्त केला.

हृदयरोग प्रतिबंध

आपल्या हृदयाची गती, आपल्या शरीराला लागणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण हे आणि असे प्रमुख घटक नियमित बारकाईने बघितले पाहिजे. त्यात बदल झाल्यास हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण, त्यामुळे भविष्यातील हृदयरोगाला प्रतिबंध करता येईल.

हा धोका असतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तीन मुख्य रक्तवाहिन्या असतात. त्यापैकी कोणत्याही रक्तवाहिनीमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन रक्तपुरवठा खंडित झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो.

हृदयविकाराची जोखीम अशी करा कमी

  • नियमित व्यायाम करा

  • मद्यपान, धूम्रपान,

  • तंबाखूसेवन करू नका

  • स्थूलता वाढू देऊ नका

  • आपली जीवनशैली चांगली ठेवा

  • मधुमेह, रक्तदाब,

  • कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवा

loading image
go to top