World Obesity Day : मुलांच्या लठ्ठपणाकडे दुर्लक्ष नको

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

प्रतिबंधात्मक उपायांवर द्या भर
लठ्ठपणा हा आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचार खूप आधीपासून करावे लागतात. एकदा हा आजार झाल्यानंतर त्याचे उपचार पूर्ण केल्याशिवाय रुग्ण बरा होत नाही. वय वाढल्यानंतर कदाचित उपचाराची वेळ निघून गेलेली असेल. त्यामुळे योग्य वयात अचूक निदान आणि प्रभावी उपचार आवश्‍यक आहेत.

पुणे - तुमच्या मुलाचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी आहे का? तो लठ्ठ आहे का? त्याचे वजन उंचीच्या प्रमाणात खूप जास्त आहे का? या तीनही प्रश्‍नांची उत्तरे ‘हो’ असल्यास त्याला नजीकच्या भविष्यात मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब होण्याचा धोका आहे. लठ्ठपणा हा आजार आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नका. भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी आत्तापासूनच प्रतिबंधात्मक उपाय करा, असा सल्ला बेरियाट्रिक शल्यचिकित्सक डॉ. शशांक शहा यांनी गुरुवारी दिला.

शुक्रवारी (ता. ११) असलेल्या जागतिक स्थूलता दिनानिमित्त त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. डॉ. शहा म्हणाले, ‘‘गेल्या दोन दशकांमध्ये लहान मुलांमधील लठ्ठपणा वेगाने वाढत आहे. गेल्या दहा वर्षांपासून त्यातला धोका वाढला आहे. लहान मुलांमधील फक्त लठ्ठपणा वाढत नाही, तर त्याचबरोबर लहान वयातच मुलांना मधुमेह होतो. उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल असे दीर्घकालीन आजार या मुलांना होऊ लागले आहेत. या सर्व आजारांची सुरवात या लहान मुलांमध्ये होते; त्याला मुख्य कारण त्यांच्यातील लठ्ठपणा असतो. त्यामुळे त्यांच्या पालकांनी या लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करू नये. या आजारांची सुरवात लहानपणीच झाल्याने भविष्यात त्यांना हृदयविकारासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. त्यातून पुढच्या पिढीचे आयुष्य कमी होऊ शकते, असे विविध अभ्यासाच्या निष्कर्षांवरून आता स्पष्ट दिसत आहे.’’

पालकांनी आपल्या मुलांवर योग्य वेळी प्रभावी उपाय न केल्यास पुढील पिढीमध्ये मधुमेह आणि हृदयविकाराचे रुग्ण दिसतील. त्याचा थेट फटका देशाच्या विकासावर होणार आहे. देशाच्या तरुण पिढीपुढेच आरोग्याचे आव्हान उभे राहील. त्यासाठी आता समाज आणि सरकार यांनी एकत्र येऊन या लठ्ठपणाच्या साथीला आळा घालणे, ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लठ्ठपणा हा आजार असल्याचे आता जगाने मान्य केले आहे. यापूर्वी लठ्ठपणा कमी करण्याच्या शस्त्रक्रियेकडे ‘कॉस्मेटिक’ म्हणून पाहिले जायचे. मात्र, गेल्या वर्षभरापासून याकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे. ही शस्त्रक्रिया सौंदर्याशी संबंधित नसून ती रुग्णाचे प्राण वाचविणारी (लाइफ सेव्हिंग) आहे, असा विचार जागतिक वैद्यकशास्त्राने मान्य केला आहे. त्यामुळे यापूर्वी लठ्ठपणा कमी करण्याच्या बॅरियाट्रिक शस्त्रक्रियेचे वय १८ होते, ते आता पंधरा वर्षांपर्यंत कमी करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Obesity Day Do not overlook the obesity of children