‘आवाजाच्या दुनिये’ची जादू कायम

सचिन वाघमारे
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी मदत होऊ शकते. फक्त व्यावसायिकता नसल्यामुळे त्यांना निधीची समस्या भासते. त्यामुळे त्यात सातत्य राखता येत नाही. शासनाने याकडे लक्ष दिल्यास मोठा बदल घडू शकतो.
- युवराज जाधव, रेडिओ अभ्यासक

पुणे - इंटरनेटचे जाळे आणि सोशल मीडियाचा वापर, यामध्ये रेडिओ माध्यमाचा ‘आवाज’ कमी झाल्यासारखा वाटत असला; तरी आजही रेडिओच्या ‘आवाजाच्या दुनिये’ची जादू कायम आहे. काळाप्रमाणे तंत्रज्ञान आणि कार्यक्रमांच्या मांडणीचे स्वरूप बदलत गेले; तरी एफएम, कम्युनिटी रेडिओ, इंटरनेट रेडिओच्या स्वरूपात रेडिओने अनेकांच्या मनात ‘आपली आवड’ जपली आहे. लवकरच भारतात डिजिटल मोबाईल रेडिओ (डीएमआर) ही अत्याधुनिक रेडिओ यंत्रणा सुरू होणार आहे. त्यामुळे तो इंटरनेटशिवायही ऐकता येईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

युनेस्कोने २०११ मध्ये जागतिक रेडिओ दिनाची सुरुवात (१३ फेब्रुवारी) केली. आपत्तीच्या काळात रेडिओची होणारी मदत आणि विविध प्रकारच्या सामाजिक गटांना जोडणारा महत्त्वाचा घटक म्हणून जगभर या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या या कार्यक्रमाची थीम ‘रेडिओ आणि विविधता’ अशी आहे. त्याद्वारे जगभरातील विविधतेचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी करण्याचा संदेश देण्यात येणार आहे. रेडिओचा शोध हा संपर्क क्षेत्रातील मैलाचा दगड मानला जातो. युद्ध, आपत्तीसारख्या काळात त्याचा फायदा झाला. त्याबरोबरच शेती, शिक्षण, संगीत, बातम्या आणि माहितीचे आदान-प्रदान यामध्ये रेडिओने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

एखाद्या शहरासाठी मर्यादित फ्रिक्वेन्सीद्वारे चालविले जाणारे एफएम रेडिओ १९७२ मध्ये भारतात आले. २०१०च्या दशकात ते लोकप्रिय झाले. देशभरात आज विविध शहरांमध्ये शंभरहून अधिक एफएम केंद्र चालविली जातात. मुख्यत: तरुणाई हेच त्यांचे ‘टार्गेट ऑडियन्स’ असतात.

पुणे, सोलापूर, सांगलीसह राज्यातील अनेक आकाशवाणी चॅनेल्स हे ऑल इंडिया रेडिओ या ॲपवर ऐकता येतात. जगभरातील इंग्रजीसह अन्य भाषांतील केंद्रही ॲपवर ऐकता येतात. तसेच, radio.garden.com या एकाच लिंकवर जगभरातील रेडिओ केंद्रांवर संगीत, भाषा शिक्षण, बातम्या, कम्युनिटी संदेश ऐकता येतात.

कम्युनिटी रेडिओला मागणी
मुख्यत: शेती, स्वयंसेवी संघटना आणि शैक्षणिक हेतूसाठी चालविल्या जाणाऱ्या रेडिओ केंद्रांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातून परवानगी दिली जाते. सध्या पुण्यामध्ये पुणे विद्यापीठात विद्यावाणी आणि बारामतीमध्ये अशाप्रकारचे रेडिओ कम्युनिटी केंद्र सुरू आहे. कोल्हापूर, सातारा, सोलापूरमध्येही अशी केंद्र आहेत. व्यावसायिक केंद्राच्या तुलनेत या केंद्राच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत हवा तो संदेश लवकर पोचवता येतो. तसेच, तो त्यांच्या स्थानिक भाषेत असतो. त्यातून अपेक्षित परिणाम चांगल्या प्रकारे साधता येतो आणि प्रतिसादही त्वरित मिळतो. कम्युनिटी रेडिओसाठी सध्या राज्यभरातून २५ पेक्षा अधिक प्रस्ताव आहेत.

डीएमआर रेडिओ काय आहे?
डिजिटल मोबाईल रेडिओ हे नवे तंत्र आहे. याद्वारे रेडिओवर तुम्हाला अधिक स्पष्ट, मोठा आवाज ऐकता येतो. तसेच त्याची उच्च फ्रिक्वेन्सी, सर्वांसाठी मोफत उपलब्धता, उत्तम सुरक्षितता, यामुळे येणाऱ्या काळात ते अधिक लोकप्रिय होणार आहे. डीएमआरद्वारे अनेक स्टेशन्सचा मेळ आणि बहुसंज्ञापन साध्य होणार आहे. भारतात ते एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी सुरू होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Radio Day Special