कुस्तीपटूचे नुकसान होऊ देणार नाही - शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर कारवाई करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची नोटीस, खुलासा मागविला नव्हता.

कुस्तीपटूचे नुकसान होऊ देणार नाही - शरद पवार

पुणे - महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर कारवाई करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची नोटीस, खुलासा मागविला नव्हता. याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण परिषदेच्या कारभारात ज्यांच्याबद्दल तक्रारी आल्या आहेत. त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू. पण याचा खेळाडूंच्या भवितव्यावर किंचितही परिमाण होऊ देणार नाही, असे राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले

भारतीय कुस्ती महासंघाने राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली. त्यामुळे शरद पवार यांना धक्का दिल्याचे मानले जात होते. त्यावर पवार यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार म्हणाले, ‘राज्य कुस्तीगीर परिषदेचा मी अध्यक्ष असलो तरी केवळ राज्य व राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणे, खेळाडूंना मदत करणे, शासनाकडून सुविधा, प्रशिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. यातून राहुल आवारे, अभिजित कटके, उत्कर्ष काळे यासह इतर खेळाडूंना मदत केली. काही जखमी खेळाडूंनाही मदत केली आहे. पण खेळाडूंची निवड व इतर अंतर्गत निर्णयात मी सहभागी होत नाही. कबड्डी, खो खो या खेळाच्या राज्य संघटना, राष्ट्रीय संघटना व आशिया संघटनेचा मी प्रमुख होतो. क्रिकेटच्या देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनेनाचही अध्यक्ष होते. पण येथे काम करताना मी केवळ खेळाडूंना सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केल्याने राष्ट्रीय पातळीवर याबाबत मी काही जणांकडे चौकशी केली. त्यामध्ये महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या कार्यपद्धतीबाबत काही तक्रारी आल्या होत्या. महासंघाने सांगितल्याप्रमाणे स्पर्धा घेतल्या नसल्याने ही संघटना बरखास्त केल्याचे कळाले. यावर या संघटनेच्या समस्या सोडविण्यासाठी दिल्लीला गेल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर चर्चा करणार आहे. राज्य कुस्ती परिषदेच्या कारभारात ज्यांच्याबद्दल तक्रारी आल्या आहेत. त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू. या कारवाईत कोणतेही राजकारण नाही. राज्याच्या संघटनेत मी अध्यक्ष आहे, वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस, काका पवार असे काही प्रमुख पदाधिकारी आहोत. आम्ही एकत्र बसून अन्य पदाधिकाऱ्यांची भूमिका समजून घेऊ. काही चुकीचे निर्णय घेतले असतील तर ते दुरुस्त करू, गैरसमजुतीने निर्णय घेतला असेल तर राष्ट्रीय संघटनेच्या प्रमुखांशी चर्चा करून यातून महाराष्ट्र शाखेला बाहेर काढू. या निर्णयाचा खेळाडूंच्या भवितव्यावर किंचितही परिणाम होऊ देणार नाही, असे पवार यांनी सांगितले.

Web Title: Wrestlers Will Not Be Harmed Sharad Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sharad Pawarpunewrestler
go to top