

पैलवानांची भूमी
---------------
कऱ्हाड तालुका हा शूरवीर, कष्टाळू शेतकरी आणि नामवंत पैलवानांची भूमी म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील अनेक गावांनी कुस्ती क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्यापैकी सुर्ली हे गाव कुस्तीच्या समृद्ध परंपरेमुळे विशेष ओळख निर्माण करून आहे. गावाची लोकसंख्या तुलनेने कमी असली, तरी कुस्तीबद्दलची निष्ठा, मेहनत आणि जिद्द यामुळे गावाने राज्यभरात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. येथे शेती आणि कुस्ती यांचे अतूट नाते असून, शेतातील कष्ट आणि आखाड्यातील मेहनत यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो.
गावामध्ये कुस्ती हा केवळ खेळ नसून तो गावाच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. गावातील अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यान् पिढ्या कुस्तीची परंपरा जपली गेली आहे. लहानपणापासूनच मुलांना व्यायाम, शिस्त आणि मेहनतीचे धडे दिले जातात. त्यामुळे गावातील युवकांमध्ये कुस्तीबद्दल विशेष आकर्षण दिसून येते. शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास आणि चिकाटी या गुणांची जपणूक कुस्तीच्या माध्यमातून होत असल्याने पालकही आपल्या मुलांना या खेळासाठी प्रोत्साहन देतात. गावातील हनुमान मंदिराशेजारी असलेली मातीची तालीम ही गावच्या कुस्ती परंपरेचे केंद्रस्थान मानली जाते. पहाटे पाच वाजल्यापासून तालमीत हालचाल सुरू होते. पहाटेच्या शांत वातावरणात पैलवान दंड-बैठका, जोर-बैठका, दोरीच्या उड्या, मल्लखांब आणि विविध प्रकारचे व्यायाम करताना दिसतात. मातीच्या आखाड्यात घाम गाळत शरीर घडविण्याची ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने सुरू आहे. कुस्ती हा खेळ केवळ ताकदीचा नसून त्यासाठी संयम, शिस्त आणि सातत्य आवश्यक असते, याची जाणीव तालमीतून युवकांना करून दिली जाते. गावच्या कुस्ती परंपरेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे आजही गुरू-शिष्य परंपरा जिवंत आहे. गावातील ज्येष्ठ आणि अनुभवी पैलवान नवीन पिढीला मार्गदर्शन करतात. कुस्तीतील डावपेच, शरीरसाधना, आहार आणि स्पर्धेतील शिस्त यांचे धडे ते आपल्या शिष्यांना देतात. त्यामुळे केवळ कुस्तीचे तंत्रच नव्हे, तर खेळाडूवृत्ती आणि संस्कार यांचाही वारसा पुढील पिढीकडे पोहोचत आहे. हीच परंपरा गावातील कुस्ती संस्कृती अधिक समृद्ध करत आहे.
हिंदकेसरी संतोष वेताळ प्रेरणास्थान
गावाचे नाव कुस्ती क्षेत्रात विशेष अभिमानाने घेतले जाते, कारण याच गावाने सातारा जिल्ह्याला पहिले हिंदकेसरी दिले. हिंदकेसरी संतोष पांडुरंग वेताळ अर्थात संतोषआबा वेताळ हे सुर्लीच्या मातीतील एक तेजस्वी रत्न ठरले आहेत. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून केवळ गावाचेच नव्हे, तर संपूर्ण सातारा जिल्ह्याचे नाव देशभर पोहोचवले. त्यांचे यश आजच्या युवा पैलवानांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांच्या कामगिरीमुळे सुर्लीच्या कुस्ती परंपरेला नवी ओळख मिळाली असून, गावातील अनेक युवकांनी कुस्ती क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार केला आहे. गेल्या काही वर्षांत सुर्लीतील अनेक पैलवानांनी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदके पटकावून त्यांनी गावाचा गौरव वाढवला आहे. आजही अनेक होतकरू पैलवान कोल्हापूरसारख्या कुस्तीच्या केंद्रांमध्ये जाऊन नामांकित वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. आधुनिक प्रशिक्षणासोबत पारंपरिक तालमीची जोड देत ते मोठ्या स्पर्धांसाठी स्वतःला सिद्ध करत आहेत.
आकाराने छोटे गाव असले, तरी कुस्ती क्षेत्रातील त्याचे योगदान मोठे आहे. गावातील आखाडे, तालीम, गुरू-शिष्य परंपरा आणि पैलवानांची मेहनत यामुळे कुस्तीची परंपरा आजही टिकून आहे. बदलत्या काळात अनेक ग्रामीण खेळ मागे पडत असताना गावाने मात्र, आपल्या मातीशी असलेली नाळ कायम ठेवली आहे. त्यामुळे कुस्ती हा खेळ येथे केवळ परंपरा नसून गावाच्या ओळखीचा, संस्कृतीचा आणि अभिमानाचा अविभाज्य भाग बनला आहे.
PNE26W40506
सुर्ली कुस्ती मैदान फोटो
PNE26W40509
सुर्ली कुस्ती मैदान फोटो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.