लेखकांना सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य नाही : डॉ. रावसाहेब कसबे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेखकांना सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य नाही : डॉ. रावसाहेब कसबे

लेखकांना सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य नाही : डॉ. रावसाहेब कसबे

पुणे : ‘‘देशात सध्या अराजक माजले आहे. इथे काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, मात्र सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यामुळेच अनेक लेखकांनी लेखणीचा त्याग केला आहे. लेखकांमध्ये भितीचे आणि संभ्रमाचे वातावरण आहे’’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) ११४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कसबे म्हणाले, ‘‘बाहेरच्या जगातील आनंदाला आणि आक्रोशाला आतल्या आवाजाने दिलेला प्रतिसाद म्हणजे साहित्य. पण आपण हा आनंद गमावून भयाच्या सावटाखाली जगत आहोत. देशातील विचारवंतही घाबरलेले आहेत. मात्र साहित्याने ही भीती नष्ट करता येते. म्हणून साहित्यिकांनी ताठ मानेने उभे राहायला हवे.’’

या वेळी कसबे यांच्या हस्ते ‘मसाप’तर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. गेल्या वर्षी कोरोनामुळे पुरस्कार समारंभ होऊ न शकल्याने यंदा २०१९ व २०२० अशा दोन्ही वर्षांच्या पुरस्कारांचे एकत्रित वितरण करण्यात आले.

‘मसाप जीवनगौरव पुरस्कार’ डॉ. न. म. जोशी (२०१९) आणि डॉ. अनिल अवचट (२०२०) यांना प्रदान करण्यात आला. ‘भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारा’ने डॉ. सुनीलकुमार लवटे (२०१९) आणि मोहन रेडगांवकर (२०२०) यांना सन्मानित करण्यात आले. तर ‘उत्कृष्ट शाखा पुरस्कार’ डोंबिवली शाखेने (२०१९) आणि चिपळूण शाखेने पटकावला. यासह ‘मसाप कार्यकर्ता आणि शाखा कार्यकर्ता पुरस्कार’ तसेच ‘ग्रंथ व ग्रंथकार पुरस्कार’ही प्रदान करण्यात आले.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

या प्रसंगी मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, तसेच परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष राजीव बर्वे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार आदी उपस्थित होते. परिषदेचे कार्यवाह उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.

कसे असावे साहित्य?

या वेळी डॉ. अनिल अवचट यांनी साहित्याची व्याख्या स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे साहित्य ‘साच आणि मवाळ, मित आणि रसाळ’ असे असावे. म्हणजेच साहित्य नेमके हवे, त्यात पाल्हाळ नको. तसेच ते कंटाळवाणे नाही, तर रसाळ हवे. आजकाल मात्र थेट मोठमोठे ग्रंथच लिहिले जात आहेत. परंतु, जे विचार करायला भाग पाडते, तेच खरे साहित्य.’’

loading image
go to top