'नंबर गलत है' :आरटीई अ‍ॅडमिशनची माहिती देणाऱ्या राज्य हेल्पलाइनचा रॉंग नंबर!

मिनाक्षी गुरव
Tuesday, 29 September 2020

- शिक्षण विभागाकडून कोणतेही स्पष्टीकरण नाही
- हेल्पलाइन क्रमांक डायल केल्यावर 'नंबर गलत है' पडतय कानावर

पुणे : शिक्षण हक्क कायद्यातंर्गत २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी, पालकांच्या समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी, पालकांच्या शंका आणि अडचणी समजून घेत, त्यावर मार्ग काढण्यासाठी सहकार्य म्हणून 'राज्य हेल्पलाइन' कार्यन्वित करण्यात आली. मात्र आता ही 'हेल्पलाइन'च चूकीची ठरत आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

आरटीईनुसार वंचित आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशादरम्यान पालकांना काही अडचण आल्यास त्या सोडविण्यास मदत म्हणून 'राज्य हेल्पलाइन' विकसित करण्यात आली. परंतु या हेल्पलाइनचा क्रमांक डायल केल्यावर 'हा क्रमांक चुकीचा असल्याची माहिती दिली जात आहे. परिणामी पाल्याच्या प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेले पालक चांगलेच वैतागले आहेत.

शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शाळा सुरू होऊन तीन महिने उलटले. परंतु तरीही २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कोणतीही माहिती शिक्षण विभागाकडून दिली जात नसल्याने पालक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. पाल्याच्या प्रवेशाबाबत प्रवेशाच्या संबंधित पोर्टल लॉगिन केल्यानंतर कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्याने, त्याबाबत विचारपूस करण्यासाठी पोर्टलवर दिलेल्या 'राज्य हेल्पलाइन' क्रमांक पालक मोबाईलवर फिरवत आहेत. पोर्टलवर हेल्पलाइन म्हणून दिलेला नंबर डायल केल्यावर 'यह नंबर गलत है' असा संदेश येत असल्याने पालक हवालदिल झाले आहेत. या हेल्पलाइन नंबरविषयी शिक्षण विभागाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"आमच्याकडे कामाला येणाऱ्या मावशींनी मुलाला खासगी शाळेत आरटीई २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश मिळावा, म्हणून ऑनलाइन अर्ज केला आहे. पण प्रवेशाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळत नसल्याने मी संबधित पोर्टलवरील 'राज्य हेल्पलाइन' क्रमांक डायल केला. पण फोन केल्यावर चक्क 'आपकेद्वारा डायल किया नंबर गलत है' असे कानावर पडत आहे. त्यामुळे प्रवेशासाठी कोठे संपर्क साधायचा हे त्यांना काही कळेना", असा अनुभव पूजा वानखेडे यांनी सांगितला.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wrong number of state helpline giving information about RTE admission