एल्गार परिषदेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय; पुढील सुनावणी पुण्यात नाही!

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

संशयित आरोपी आणि जिल्हा सरकारी वकिलांनी सुनावणी वर्ग करण्यास विरोध केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळत "एनआयए'ने केलेला अर्ज मंजूर केला

पुणे : एल्गार परिषद आणि माओवादी संबंध प्रकरणाची कागदपत्रे व सुनावणी मुंबई येथील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयात वर्ग करण्याचा आदेश येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी दिला. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता मुंबईत होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या प्रकरणातील संशयित आरोपी आणि जिल्हा सरकारी वकिलांनी सुनावणी वर्ग करण्यास विरोध केला होता. मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळत "एनआयए'ने केलेला अर्ज मंजूर केला. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. संशयित तसेच जप्त केलेला मुद्देमाल 28 फेब्रुवारी किंवा त्यापूर्वी "एनआयए'च्या विशेष न्यायालयात हजर करावा, असे आदेशात म्हटले आहे. "एनआयए'कडे तपास गेल्याने त्याच्या सुनावणीसाठी पुण्यातही न्यायालय आहे. याबाबत "एनआयए'ने दिलेल्या निकालाचे संदर्भ या प्रकरणात लागू होत नाहीत, असे जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयात सांगितले होते, तर "एनआयए'ने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर निर्णय देण्याचा अधिकार सध्या सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयास नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जामिनाची शक्‍यता दुरावली? 
गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. येत्या काही दिवसांत संशयित आरोपींविरोधात दोषारोप निश्‍चित करण्यात येणार होते. त्यामुळे पुढील तपास पुणे पोलिसांकडे असता किंवा एसआयटीची स्थापन झाली असती तर संशयितांना जामीन मिळण्याची शक्‍यता होती. मात्र, आता "एनआयए'कडे तपास गेल्याने जामीन मिळण्याची शक्‍यता दुरावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yalgaar parishad pune hearing nia mumbai special court