तंत्रज्ञानामुळे शेतीचा प्रवास समृद्ध

तंत्रज्ञानामुळे शेतीचा प्रवास समृद्ध
Published on: 

काटेवाडी येथील यतीन घुले यांनी १५ एकरांत ऊस उत्पादनात एकरी १०३ टन तर केळी उत्पादनात एकरी ३८ टनांपर्यंत मजल मारली आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी धैंचाच्या हिरवळीच्या खताचा प्रयोग, निर्यातक्षम केळी उत्पादन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रयोगशीलतेतून त्यांनी आपल्या शेतीचा प्रवास समृद्ध केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये त्यांना ‘शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्काराने सन्मानित केले.
- अभिजित देशपांडे, काटेवाडी

यतीन घुले यांची १५ एकरांत शेतीची प्रयोगशाळा, ऊस आणि केळीचे एकरी विक्रमी उत्पादन, धैंच्याच्या हिरवळीच्या खताच्या यशस्वी प्रयोगामुळे शेती समृद्ध झाली. ‘शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून काळ्या आईची सेवा आहे’ या भावनेतून काम करणारे शेतकरी आजच्या काळात शेतीला नवी दिशा देत आहेत. शिक्षणाचा उपयोग प्रत्यक्ष शेतात करून आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, प्रयोगशीलता आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर शेतीत वेगळा ठसा उमटविणारे यतीन घुले हे त्यापैकीच एक नाव आहे.


शिक्षण शेतीच्या उन्नतीसाठी!
घुले यांनी बी.एस्सी. ॲग्रीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सन २००३ मध्ये नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःच्या शेतात काम करण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक अनुभवाला शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड देत त्यांनी ऊस आणि केळी या पिकांवर विशेष लक्ष केंद्रित केले. पीक व्यवस्थापन, खतांचा वापर, पाण्याचे नियोजन आणि सुधारित वाणांचा अभ्यास या बाबींमध्ये सातत्य राखत त्यांनी उत्पादनवाढीचा ध्यास घेतला.

ऊस उत्पादनात २००४ पासून सातत्यपूर्ण कामगिरी हा त्यांच्या शेतीचा महत्त्वाचा पैलू आहे. योग्य नियोजन आणि प्रयोगशीलतेच्या जोरावर त्यांनी एकरी १०३ टनांपर्यंत ऊस उत्पादन घेतले. हे यश केवळ उत्पादनाच्या आकड्यापुरते मर्यादित नसून त्यामागे असलेला अभ्यास, निरीक्षण आणि मेहनतीचा प्रवासही तितकाच महत्त्वाचा आहे.

पाडेगावच्या संशोधनाशी शेताची नाळ
ऊस उत्पादनात सुधारणा करण्यासाठी संशोधन आणि प्रत्यक्ष शेती यांचा समन्वय आवश्यक असतो. घुले यांनी पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राशी सातत्यपूर्ण संबंध ठेवला आहे. विविध ऊस वाणांच्या चाचण्यांसाठी त्यांच्या शेताची निवड केली जाते. संबंधित वाणांची लागवड, निरीक्षणे आणि चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या अनुभवाचा उपयोग पुढील प्रसारासाठी होतो. त्यामुळे त्यांचे शेत हे केवळ उत्पादनाचे क्षेत्र न राहता नव्या वाणांच्या चाचण्या आणि प्रात्यक्षिकांसाठीही उपयुक्त ठरले आहे.

कृषी विज्ञान केंद्र, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) आणि छत्रपती सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने पिकांची मानके निश्चित करण्यासाठी त्यांच्या शेतातील प्लॉटवर प्रयोग सुरू आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पीक व्यवस्थापन अधिक अचूक करण्याची त्यांची धडपड आहे. तंत्रज्ञानाचा वापर केवळ चर्चेपुरता न ठेवता तो प्रत्यक्ष शेतात परिणामकारक कसा ठरेल, यावर घुले यांचा भर आहे.

स्थानिक बाजारपेठेतून निर्यातीपर्यंतची झेप
घुले यांनी २००९ मध्ये केळी उत्पादनाला सुरुवात केली. सुरुवातीच्या वर्षात केळी स्थानिक बाजारपेठेत विकल्यानंतर पारंपरिक विक्री पद्धतीत अपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याच्या मर्यादा त्यांच्या लक्षात आल्या. त्यानंतर त्यांनी निर्यातक्षम केळी उत्पादनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. दर्जा, उत्पादन व्यवस्थापन आणि बाजारपेठेच्या गरजा यांचा अभ्यास करत त्यांनी केळी निर्यातीसाठी आवश्यक गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले. यामुळे त्यांना आर्थिक यश लाभले. त्यांच्या शेतात एकरी ३८ टनांपर्यंत केळी उत्पादन मिळाले. मात्र, स्वतःच्या शेतीतील यशावर समाधान मानून ते थांबले नाहीत. परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी प्रोत्साहित केले. दर्जेदार उत्पादनासाठी आवश्यक पद्धती समजावून सांगत त्यांच्या शेतातील केळीचे प्लॉटही निर्यातीसाठी योग्य बनविण्याच्या दिशेने प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा इतर शेतकऱ्यांनाही झाला.

धैचाच्या हिरवळीच्या खताचा प्रयोग
शेतीत बदल घडविण्यासाठी केवळ मोठी गुंतवणूकच आवश्यक असते, असे नाही तर उपलब्ध साधनांचा योग्य वापर आणि नावीन्यपूर्ण विचारही महत्त्वाचा असतो. २००६-०७ च्या सुमारास शेतीत खत व्यवस्थापनासाठी मेंढ्या बसविणे आणि शेणखत वापरणे अशा पद्धती प्रचलित होत्या. या पार्श्वभूमीवर घुले यांनी धैचा या हिरवळीच्या खताच्या पिकाचा वापर करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला त्यांच्या या प्रयोगाची गावात खिल्ली उडविण्यात आली. मात्र, त्यांनी प्रयोग सुरू ठेवले. सुमारे दोन वर्षांनंतर जमिनीच्या पोतामध्ये आणि पिकांच्या वाढीमध्ये झालेल्या बदलांचा अनुभव त्यांना आला. पुढे त्यांच्या प्रयोगांची दखल शासन आणि परिसरातील साखर कारखान्यांनी घेतली. हिरवळीच्या खताला प्रोत्साहन देण्यासाठी बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासारख्या उपक्रमांना चालना मिळाली. या प्रयोगामागील महत्त्वाचा विचार म्हणजे जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवत दीर्घकालीन उत्पादनक्षमता वाढविणे.

उडदातून जमिनीच्या आरोग्याची जपणूक
पीक उत्पादन वाढविताना जमिनीचा पोत आणि पाण्याची उपलब्धता यांचाही विचार केला पाहिजे, असे घुले मानतात. त्यामुळे त्यांनी उन्हाळी उडदासारख्या द्विदल पिकाचा अवलंब केला आहे. कमी कालावधीत येणारे हे पीक जमिनीच्या सुपीकतेसाठी उपयुक्त ठरू शकते. तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या दृष्टीनेही त्याला महत्त्व आहे.

ऊस आणि केळीसारख्या नगदी पिकांसोबतच जमिनीची गुणवत्ता सुधारणाऱ्या पिकांचाही विचार करणे, हा त्यांच्या शेती नियोजनातील महत्त्वाचा भाग आहे. उत्पादनवाढीबरोबरच मातीचे आरोग्य, पाण्याचे नियोजन आणि दीर्घकालीन शाश्वतता यांचा समतोल साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

देशातील शेतीच्या विकासासाठी योगदान
यतीन घुले यांच्या शेतीप्रवासातील एक उल्लेखनीय प्रसंग त्यांच्या देशप्रेमाची जाणीव करून देतो. टांझानिया देशातील कमलेश माहेश्वरी यांनी त्यांना सुमारे दहा हजार एकर ऊसशेती विकसित करण्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी मोठ्या आर्थिक मोबदल्याची ऑफर दिली होती. मात्र, स्वतःच्या मायभूमीतील शेती आणि येथील शेतकऱ्यांसोबत राहून काम करण्याला प्राधान्य देत त्यांनी ही संधी नाकारल्याचे सांगितले जाते. परदेशातील मोठ्या संधीपेक्षा आपल्या मातीशी असलेली नाळ आणि देशातील शेतीच्या विकासासाठी योगदान देण्याची भावना त्यांनी महत्त्वाची मानली.

पुरस्कारांतून कार्याचा गौरव
शेतीतील प्रयोगशीलता, उत्पादनवाढ आणि नव्या तंत्रज्ञानाच्या वापराची दखल घेत महाराष्ट्र शासनाने १ जुलै २०२६ रोजी घुले यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्काराने सन्मानित केले. मानाचा पुरस्कार महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल श्री जिष्णू देव वर्मा साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार (वहिनीसाहेब) आणि कृषिमंत्री दत्तात्रेय (मामा) भरणे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनीही त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला आहे. याशिवाय छत्रपती सहकारी साखर कारखाना, पंचायत समिती बारामती आणि कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती यांच्याकडूनही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

जमिनीच्या आरोग्याचा विचार
शेतीतील यश हे केवळ एका हंगामातील विक्रमी उत्पादनाने ठरत नाही. त्यासाठी सातत्य, अभ्यास, जमिनीशी निष्ठा आणि नव्या प्रयोगांना सामोरे जाण्याची तयारी आवश्यक असते. काटेवाडीतील आपल्या १५ एकर शेतीत यतीन घुले यांनी ऊस आणि केळी उत्पादनातील अनुभवातून हेच सिद्ध केले आहे. स्वतःच्या शेतीत यश मिळविण्याबरोबरच इतर शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान पोहोचविणे, संशोधनासाठी शेत उपलब्ध करून देणे आणि जमिनीच्या आरोग्याचा विचार करणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत.

काळ्या आईला केंद्रस्थानी ठेवून विज्ञान, तंत्रज्ञान आणि अनुभव यांची सांगड घातली तर शेतीत नवी क्षितिजे गाठता येतात. यतीन घुले यांचा प्रवास हा याच विश्वासाचा प्रेरणादायी प्रत्यय आहे.


01066, 62324, 01064

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com