यंदा फटाक्‍यांचा आव्वाज कमीच; खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह कमी 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

लॉकडाउनमुळे अनेक उद्योगांमध्ये वेतन कपात, कामगार कपात यांसारखे निर्णय झाले. त्यामुळे आवश्‍यक वस्तूंच्या खरेदीचा कल बाजारात आहे. त्यात गृहोपयोगी वस्तू, कपडे यांसारखी खरेदी सुरू आहे.

पुणे - सार्वजनिक ठिकाणी फटाके उडविण्यास बंदी, राज्य सरकारचे प्रदूषण मुक्त दिवाळीचे आवाहन, लॉकडाउनमुळे मंदावलेले आर्थिक चक्र, यामुळे यंदा नागरिकांनी फटाके खरेदीवरील खर्च कमी केल्याचे चित्र आहे. दिवाळी सुरू झाली तरी फटाक्‍यांचा आवाज अजूनही कमी आहे. आमच्याकडे फटाक्‍यांचा माल पडून असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

लॉकडाउनमुळे अनेक उद्योगांमध्ये वेतन कपात, कामगार कपात यांसारखे निर्णय झाले. त्यामुळे आवश्‍यक वस्तूंच्या खरेदीचा कल बाजारात आहे. त्यात गृहोपयोगी वस्तू, कपडे यांसारखी खरेदी सुरू आहे. मात्र, फटाक्‍यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत अल्प प्रतिसाद मिळतो आहे. दरवर्षी दिवाळीत प्रौढ नागरिकही फटाके उडविण्याची मजा घेतात. परंतु कोरोनाच्या वातावरणामुळे यंदा प्रदूषण कमी व्हावे, अशी भावनाही नागरिकांमध्ये आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दिवाळीमुळे बाजारपेठांमध्ये चैतन्य असले, तरी सोने, कपडे आणि गृहोपयोगी वस्तू खरेदीवर ग्राहकांचा भर आहे. फटाके बाजारात लहान मुलांसाठी कमी आवाजाचे फटका घेतले जात आहेत. फटाके विक्री मंदावल्याने ध्वनिप्रदूषणात घट होण्याचा अंदाजही तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. फटाके खरेदीसाठी आलेले राहुल जाधव म्हणाले, की यंदा फटाके उडवावेत, एवढा उत्साह नाही. फटाकांच्या किमतीही भरमसाट असल्याने मुला-मुलींच्या आनंदासाठी किरकोळ खरेदी करीत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरात मोठी घसरण 
दिवाळी म्हटली की फटक्‍यांना मोठी मागणी असते. त्यामुळे चढ्या भावाने विक्री केली जाते. यंदा नागरिक फटाके खरेदी टाळत असल्याने किमतीही कमी होऊ लागल्या आहेत. याबाबत फटाका विक्रेता संकेत जाधव म्हणाले, ""दरवर्षीच्या तुलनेत 40 टक्के विक्री कमी आहे. माल पडून आहे, लोक विशेषतः: आवाजाचे फटके नकोच म्हणत आहेत. त्यामुळे फटाक्‍यांचे दरही कमी करावे लागत आहे. कोरोनामुळे या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year crackers sound less Customers will buy less crackers