Vidhan Sabha 2019 : हडपसरमध्ये कोण? अण्णा, पाटील की तात्या ! 

मंगेश कोळपकर
Thursday, 3 October 2019

काँग्रेस- राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघांमध्ये माळी आणि मराठा या दोन जातीचे प्राबल्य असून निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरते. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये याच मतांचं केंद्रीकरण होऊन टिळेकर यांचा  विजय झाला होता. परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये टिळेकर यांच्यावर विविध प्रकारचे आरोप झाले, त्यामुळे भाजप उमेदवार बदलेल, अशी चर्चा होती.

पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शहराध्यक्ष चेतन तुपे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे या मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे. टिळेकर, तुपे आणि मोरे हे तिन्ही उमेदवार तुल्यबळ असल्यामुळे येथील लढत चुरशीची होणार आहे.

 हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शहरातला सर्वाधिक मोठा मतदारसंघ आहे, तो आकार आणि मतदारांच्या संख्येमुळे ! तब्बल पाच लाख मतदार या मतदारसंघात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे विजयी झाले तरी त्यांना हडपसरमधून 5 हजारांची पिछाडी मिळाली होती. 

 काँग्रेस- राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघांमध्ये माळी आणि मराठा या दोन जातीचे प्राबल्य असून निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरते. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये याच मतांचं केंद्रीकरण होऊन टिळेकर यांचा  विजय झाला होता. परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये टिळेकर यांच्यावर विविध प्रकारचे आरोप झाले, त्यामुळे भाजप उमेदवार बदलेल, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात आपली उमेदवारी राखण्यात टिळेकर यशस्वी ठरले आणि या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा गेल्या वेळच्या उमेदवारांमध्ये आता लढत होणार आहे. टिळेकरअण्णा यांची कोंढव्यात, तुपे पाटील यांची मगरपट्टा तर मोरेतात्या यांची कात्रज- कोंढवा रस्त्यावर 'व्होटबँक' आहे.

 टिळेकर यांना उमेदवारीसाठी उमेश गायकवाड, तसेच मारुती तुपे, विकास रासकर यांच्या बरोबर स्पर्धा करावी लागली तर चेतन तुपे यांना प्रशांत जगताप, वैशाली बनकर, नंदा लोणकर यांच्याशी स्पर्धा करावी लागली. वसंत मोरे चार वर्षापासून विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जय्यत तयारी करत आहेत, त्यांनी विद्यमान आमदारांना अडचणीत आणण्यासाठी अनेक प्रकरणात यांच्यावर आरोप केले होते. या मतदारसंघांमध्ये काँग्रेसची मते लक्षणीय आहेत. ती  तुपे यांना मिळतील का याकडे लक्ष लागलेले आहे. तुपे पक्षाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष झाल्यापासून त्यांनी जाणीवपूर्वक या मतदारसंघांमध्ये संपर्क वाढवला आहे तर तिकडे दुसरीकडे टिळेकर यांनी ही विकासकामांची राळ उठविली आहे. हा मतदारसंघ शिवसेनेला भाजप सोडण्याची चर्चा होती. त्यामुळे माजी आमदार महादेव बाबर, नगरसेवक नाना भानगिरे तयारीत होते. परंतु, आता त्यांनाही प्रचारात सहभागी करून घेण्याचे आव्हान टिळेकर यांच्यासमोर असेल.

 त्यामुळे टिळेकर, मोरे, तुपे यांच्यातील लढत प्रेक्षणीय ठरणार आहे. यामध्ये होणारी मतविभागणी विजयी उमेदवार  निश्चित करेल, अशी चिन्हे या मतदारसंघातून दिसून येत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yogesh Tilekar Chetan Tupe and Vasant More contest election in Hadapsar