तोरणा किल्ल्यावरून पडलेल्या युवकाला वाचविण्यात यश 

मनोज कुंभार
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

तोरणा किल्ल्यावरून दरीत पडून जखमी झालेल्या युवकाला स्थानिक तरुणांनी दोरीच्या साह्याने बाहेर काढले. 

वेल्हे (पुणे) : येथील तोरणा किल्ल्यावरून दरीत पडून जखमी झालेल्या युवकाला स्थानिक तरुणांनी दोरीच्या साह्याने बाहेर काढले. 

याबाबत वेल्हे पोलिसांनी माहिती दिली की, खराडी (पुणे) येथील अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत असणारा हर्शल यशवंत पाटील (वय 21) हा तरुण आज दुपारी किल्ल्यावर आला होता. मात्र, तो किल्ल्यावरून दरीत पडल्याची माहिती वेल्ह्याचे माजी सरपंच संतोष मोरे यांना समजली. त्यांनी किल्ल्यावर नवरात्रीनिमित्त थांबलेल्या युवकांना त्याचा शोध घेण्यास सांगितले. तसेच, वेल्हे पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर वेल्हे पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, पोलिस अभय बर्गे व संतोष मोरे यांनी किल्ल्यावर धाव घेतली.

दरम्यान, किल्ल्यावरील युवकांना तो झुंजार माचीजवळील दरीत 40 ते 45 फूट खोलावर पडल्याचे दिसले. उंचावरून पडल्यामुळे तो जखमी झाला होता आणि वेदनेने विव्हळत होता. मात्र, दरी खोल असल्याने त्याला मदत करण्यात अडचण येत होती. त्यामुळे सुरवातीला पोलिसांनी आवाजाद्वारे त्याला आधार दिला. तसेच, त्याला वाचविण्यासाठी भोर येथील सह्याद्री रेस्क्‍यू टीमला बोलावले.

दरम्यान, रात्री उशिरा वेल्ह्यातील स्थानिक युवक रामदास दिघे, ज्ञानेश्वर भुरुक, नंदू खुळे, संकेत कोंडे, सुमीत पवार, कुणाल पांगारे यांनी दोरीच्या साहाय्याने त्याला वर काढले. मात्र, त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला किल्ल्याच्या पायथ्याशी आणण्यासाठी भोर येथील सह्याद्री रेस्क्‍यू टीमने रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man rescued in the valley of fort Torana