महाराष्ट्रातील तरुणांनी सुरू केली लेहमध्ये आयटी कंपनी

एथोश (Ethosh) अशा या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी स्थापन होण्यासाठी ‘असीम फाउंडेशन’ने पुढाकार घेतला आहे.
IT Company Ethosh in Leh
IT Company Ethosh in LehSakal
Summary

एथोश (Ethosh) अशा या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी स्थापन होण्यासाठी ‘असीम फाउंडेशन’ने पुढाकार घेतला आहे.

पुणे - उच्च शिक्षणाच्या (High Education) सुविधा (Facility) कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने लेह-लडाख (Leh-Ladakh) परिसरात विद्यार्थी (Students) आजही देशाच्या विविध भागात स्थलांतरित होत आहेत. आपल्या मुळ गावी नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याने ते पुन्हा लेहमध्ये येण्याचे प्रमाणही कमी आहे. मात्र आता या स्थितीत बदल होणार आहे. लेहमधील तरुणांना त्यांच्या मुळ गावीच रोजगार मिळावा म्हणून राज्यातील तीन तरुणांनी लेहमध्येच आयटी कंपनी (IT Company) स्थापन केली आहे. लेहमधील ही पहिली आयटी कंपनी आहे.

एथोश (Ethosh) अशा या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी स्थापन होण्यासाठी ‘असीम फाउंडेशन’ने पुढाकार घेतला आहे. ‘एथोश’चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पराशर, व्यवस्थापकीय संचालक राहुल देशपांडे आणि शिक्षण-विकास संचालक रवींद्र पालेकर यांनी ही कंपनी स्थापन केली आहे. २०२० मधील लॉकडाऊनच्या काळात यांगझिन ही तरुण लेहमधील तिच्या घरातून वर्क फ्रॉम होम करीत होती. येथील उच्चशिक्षित तरुण-तरुणींना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे तीने फाउंडेशनला सुचवले होते. यांगझिन यांच्या या अभिप्रायाचा विचार करून असीम फाउंडेशनने ‘एथोश’ समोर आयटी क्षेत्रात उज्ज्वल करिअर करू इच्छिणाऱ्या लडाखमधील स्थानिक तरुणांना उत्तेजना देण्यासाठी कंपनीतर्फे काहीतरी नवीन प्रकल्प करण्याबाबत प्रस्ताव मांडला. पराशर, देशपांडे आणि पालेकर यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत लेहमध्ये आपले नवे कार्यालय उघडण्याचा आणि आयटीचे शिक्षण घेतलेल्या स्थानिक तरुणांना त्यांच्या तेथील कामकाजासाठी नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. यांगझिन ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर होऊन ‘एथोश’ या कंपनीत रुजू झाली आहे. ‘एथोश डिजिटल’ ही डिजिटल कम्युनिकेशन आणि एआर-व्हीआर उत्पादनांच्या क्षेत्रात काम करणारी कॅलिफोर्नियास्थित बहुराष्ट्रीय कंपनी आहे.

स्थानिकांमध्ये उच्च शिक्षणाबाबत जागृती करण्याचा प्रयत्न :

‘असीम फाउंडेशन’ ही पुण्याची संस्था गेली अनेक वर्षे भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये काम करीत आहे. शिक्षण, उद्योजकता, आरोग्य, क्रीडा आणि शाश्वत विकास या क्षेत्रांमध्ये संस्था कार्यरत आहे. २०१२ मध्ये ‘असीम’तर्फे लडाखमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांची अभ्यास सहल पुणे आणि परिसरात आलेली असताना असे लक्षात आले, की लडाखच्या परिसरात उच्च शिक्षणाच्या सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. यासाठी असीमने ‘योनतान ला’ हा उपक्रम सुरू करून स्थानिकांमध्ये उच्च शिक्षणाबाबतीत जागृती करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच तेथील काही विद्यार्थ्यांना पुण्यातील विविध संस्थांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.

आज होणार कंपनीचे उद्घघाटन :

या कंपनीचे उद्घाटन आज (ता. १६) लडाखचे अतिरिक्त पोलिस महानिर्देशक सतीश खंदारे यांच्या हस्ते होणार आहे. लेहच्या इनक्युबेशन सेंटरच्या प्रभारी नमग्याल आंगमो (आयएएस) आणि कारगिलमधील ‘हिल डेव्हलपमेंट कौन्सिल’ चे कार्यकारी सदस्य सईद अब्बास रिझवी हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती असीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सारंग गोसावी यांनी दिली. या उपक्रमांतर्गत सध्या चार तरुण-तरुणींना याठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या वर्षात ही संख्या दहापर्यंत जाईल. थेट रोजगारनिर्मिती बरोबरच अप्रत्यक्ष रोजगारसुद्धा निर्माण होतील, असा विश्‍वास गोसावी यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com