वरातीतल्या भांडणात गुंडाला जीवघेणी मारहाण करून चासकमान कालव्यात फेकून दिले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शंकर शांताराम नाईकडे

वरातीतल्या भांडणात गुंडाला जीवघेणी मारहाण करून चासकमान कालव्यात फेकून दिले

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील कडधे येथे, काल मध्यरात्री, लग्नाच्या वरातीत झालेल्या भांडणातून सहा तरूणांनी एकावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर त्याला चासकमान धरणाच्या वाहत्या कालव्यात फेकून दिले. त्याचा मृत्यू झाला असल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे. शंकर शांताराम नाईकडे ( वय ४०, रा. कडधे, ता. खेड) असे जीवघेणा हल्ला झालेल्या इसमाचे नाव आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडधे गावात मंगळवारी झालेल्या एका लग्नाची वरात मध्यरात्री सुरू होती. त्यावेळी निलेश नवनाथ नाईकडे यांच्या घरासमोर शंकर नाईकडे व काही युवकांची बाचाबाची झाली. तिचे पर्यवसान मारामारीत झाले. सहा जणांनी त्याला दगड, विटांनी जीवघेणी मारहाण केली. नंतर गंभीर अवस्थेत त्याला चारचाकीतून चासकमान कालव्याकडे नेले व वाहत्या पाण्यात फेकून दिले. याप्रकरणी त्याच्या पत्नीने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तीवरून पोलिसांनी वासुदेव बोंबले,पवन बोंबले (दोघे रा.वेताळे, ता. खेड. स्वप्नील सावंत, निलेश पाराजी नाईकडे, ऋषिकेश उर्फ लखन नाईकडे, विलास परसुडे ( सर्व रा. कडधे, ता. खेड )या सहा जणांच्या विरोधात अपहरण केल्याचा व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सतीश गुरव पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान अतिशय गंभीर जखमी अवस्थेत शंकर नाईकडे याला कालव्यात फेकून दिले असल्याने त्याचा मृत्यू झाल्याची जोरदार चर्चा परिसरात आहे. मात्र मृतदेह मिळाल्याशिवाय आम्हाला काही सांगता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कालव्याचे पाणी बंद करण्यास धरण प्रशासनास सांगितले आहे. शंकरवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत. त्याची कडधे परिसरात दहशत होती. त्यामुळे त्याच्यावरील जीवघेण्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली.

Web Title: Youth Abducted Beaten Death Chaskaman Canal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top