युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाला अटक ‘शर्टलेस’ आंदोलन प्रकरणी चिब हेच सूत्रधार असल्याचा पोलिसांचा आरोप
युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाला अटक
‘शर्टलेस’ आंदोलन प्रकरणी चिब हेच सूत्रधार असल्याचा पोलिसांचा आरोप
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २४ ः ‘इंडिया एआय इम्पॅक्ट’ परिषदेत सदरे काढत करण्यात आलेल्या आंदोलनाचे खरे सूत्रधार युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भाून चिब हे असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दरम्यान, पटियाला हाऊस न्यायालयाने चिब यांची चार दिवसांसाठी कोठडीत रवानगी केली आहे. चिब यांच्या निर्देशावरून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते परिषदेत घुसले होते. या कार्यकर्त्यांना आवश्यक ती मदत पुरवण्याचे काम चिब यांनी केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गत शुक्रवारी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय ‘एआय’ परिषदेत घुसून अंगावरील सदरे काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. दिल्ली पोलिसांनी आंतरराज्य गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपवला आहे. दरम्यान, चिब यांना झालेल्या अटकेवरून काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर आगपाखड केली आहे. ‘‘चिब यांची अटक बेकायदा असून हुकूमशाही पद्धतीने कारभार चालवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदला घेण्याच्या राजकारणाचा हा एक भाग आहे,’’ असा आरोप काँग्रेसने केला आहे.
‘कार्यकर्त्यांचा अभिमान’
‘‘शांततामय मार्गाने आंदोलन करणे हे आमच्या रक्तात असून हा लोकशाहीतील अधिकार आहे,’’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चिब यांच्या अटकेवर दिली आहे. ‘‘देशहितासाठी निडर होऊन आवाज उठवणाऱ्या युवक काँग्रेसच्या सिंहांचा मला अभिमान आहे. सरकारने देशाच्या हितासोबत सौदा करत अमेरिकेशी व्यापार करार केला. या करारामुळे कृषी आणि वस्त्रोद्योगाला मोठा फटका बसणार आहे तर देशातील डेटा अमेरिकेच्या हाती जाणार आहे,’’ असेही गांधी यांनी म्हटले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीदेखील चिब यांच्या अटकेचा निषेध केला आहे.
आठ जणांना अटक
‘शर्टलेस’ आंदोलन प्रकरणी आतापर्यंत आठ लोकांना अटक करण्यात आली असून काही आरोपी जम्मू, अमेठी आणि हिमाचल प्रदेशात असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. दरम्यान, इंग्रजांच्या काळात जशी कारवाई केली जात असे, तशी कारवाई सध्याच्या काळात सुरू असल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे सरचिटणीस शेषनारायण ओझा यांनी दिली आहे. एआय परिषदेतील आंदोलन देशविरोधी असल्याचा प्रचार भाजप आणि केंद्र सरकार करत आहे. प्रत्येक आवाज देशविरोधी असल्याचे सांगत मूळ मुद्द्यापासून वाचण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा दावा ओझा यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

