शिक्षण मिळालं, आता रोजगारक्षम व्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhajiraje

शिक्षण मिळालं, आता रोजगारक्षम व्हा

पुणे : शंभर वर्षापूर्वी राजश्री छत्रपती शाहु महाराजांनी ‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही’ असा संदेश युवकांना दिला होता. आजही आपल्याला शिक्षणाशिवाय तरणोपाय नसून, आता केवळ शिकून चालणार नाही तर रोजगारही मिळवायला हवा, असा सल्ला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी युवकांना दिला.

शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनच्या युथ डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. सर परशुराम महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव आदी उपस्थित होते. रोजगाराभिमुख आणि उद्योगांना आवश्यक शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज संभाजीराजे यांनी व्यक्त केली. तर पारंपारिक शिक्षण पद्धतीतून जीवन समृद्ध करणे अशक्य असल्याचे स्पष्ट मत पाटील यांनी मांडले. ते म्हणाले,‘‘सरकारी नोकरीप्रमाणेच समाजातील विविध कामांना सन्मान मिळून देणे गरजेचे आहे. असंघटित क्षेत्राला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. या क्षेत्रातील लोकांना बचतीची सवय लावत, त्यांचा अतिरिक्त खर्च थांबवणे गरजेचे आहे. ही सरकारची जबाबदारी असून, त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सहयोग करावा.’’ युवकांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, सरकारी योजनांची माहिती, शिष्यवृत्तीची माहिती आदी उपक्रमांसाठी युथ डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात आल्याचे कोंढरे यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. डॉ. अडसूळ यांच्या हस्ते http://careers.shivsahyadri.org/ या माहितीपर संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.

दादा आले आणि गेले

उद्घाटन कार्यक्रमाला आलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलणे टाळलेच. कार्यक्रमालाजाण्यापूर्वी आल्यावर बोलतो असे सांगितले. मात्र कार्यक्रम झाल्यावर त्यांनी थेट गाडीचा रस्ता धरला. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री असलेले पाटील प्राध्यापक भरती, नवीन शैक्षणिक धोरण, आदी मुद्द्यांवर न बोलताच निघून गेले.