

गुरुवारी पेस्टिंग
(छायाचित्रे ः दिनेश छबिले, कानशिवणी)
युवाशक्ती पुढे सरसावली
गावच्या विकासाला गती मिळाली
अकोला जिल्ह्यातील कानशिवणी हे गाव समस्यांशी झुंजत होते. गावातील तरुणाईनेच पुढाकार घेत त्यावर मार्ग शोधला. गाव संघटित होऊन उपक्रम राबवू लागले. त्यांना साथ मिळाली कृषी विभाग, कृषी विद्यापीठाची. जलसंधारण, फळबागा, आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, पूरक व्यवसाय गावात वाढीस लागले. ग्रामविकासाला मोठी दिशा मिळाली. शेतकरी कुटुंबांसाठी उत्पन्नाचे विविध स्रोत तयार होऊन त्यांचे अर्थकारण उंचावण्यास मदत झाली आहे.
......................................................................................
गोपाल हागे
.........................................................................................
पारंपरिक शेती करणारे गाव अशीच काहीशी ओळख अकोला जिल्ह्यातील कानशिवणी गावाची पूर्वी होती. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा या प्रमुख पिकांवरच व पावसावरच गावचे अर्थकारण अवलंबून होते. बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च, मजूरटंचाई, बाजारभावांतील चढ-उतार आदी आव्हानांमुळे शेतकरी अडचणीत आला होता. परंतु या आव्हानांवर मात करून परिस्थिती बदलण्याची वेळ आली. त्याला कारणीभूत ठरले गावातील युवा शेतकरी. नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी, कृषी प्रदर्शनांना भेटी, कृषी विभागाच्या प्रशिक्षणात सहभाग, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देण्याची त्यांची वृत्ती. त्यातून गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. वैयक्तिक प्रगतीसोबत गावातील इतरांच्या विकासाचा विचार करणारी ही पिढी गावच्या परिवर्तनामागील खरी ताकद ठरली.
फळबागांनी बदलतेय गावशिवाराचे चित्र
कानशिवणी हे मध्यवर्ती बाजारपेठेचे गाव असल्याने कृषी निविष्ठा, वाहतूक, कृषी सेवा सहज उपलब्ध होतात. याच सुविधांचा उपयोग करून घेऊन शेतकऱ्यांनी संत्रा लागवडीचा पर्याय स्वीकारला. पहिल्याच वर्षी चार ते पाच तरुणांनी मिळून सुमारे २० एकर क्षेत्रावर बागा उभ्या केल्या. आज गावात १५० एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर संत्रा बागा उभ्या असून, दरवर्षी वाढ होत आहे. आज त्या उत्पादनक्षम अवस्थेत पोहोचल्या आहेत. आंबिया बहरासह काही झाडांवर मृग बहर झळकत आहे. नारायण आणि चेतन या पंडागे बंधूंनी ११ एकर क्षेत्र संत्राबागेसाठी दिले आहे. ठिबक सिंचन, संतुलित खत व्यवस्थापन, नियोजनबद्ध छाटणी, कीड- रोग व्यवस्थापन आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यामुळे बागांची गुणवत्ता चांगली जोपासली जात आहे. आठ ते १० एकरांत आंबा, तर २० एकरांच्या आसपास लिंबाच्या बागा आहेत. हळद, भाजीपाला पिकांकडेही कल आहे.
गावातील विकासाला अशी मिळाली चालना
-आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर, आत्मा यंत्रणेचे तालुका तंत्र व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, सहायक कृषी अधिकारी अशोक करवते, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अर्चना पेठे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ आदींचे झाले मार्गदर्शन.
-त्यातून घडल्या शेतीशाळा, पीक प्रात्यक्षिके, तांत्रिक प्रशिक्षणे.
-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड आदी योजनांचा लाभ.
-गावातील साडेपाचशे हेक्टरहून अधिक क्षेत्र आले ठिबक व तुषार सिंचनाखाली. शेतकरी टोकण पद्धतीने सोयाबीन घेतात. ज्वारी, कांदा बीजोत्पादनासह उन्हाळी मूग, तीळ, क्षेत्र विस्तारले.
-यंदा खरिपापूर्वी कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर काही शेतकऱ्यांनी १२५ हेक्टरवर गादीवाफा (बेड) पद्धतीने तूर लागवड केली. या पद्धतीमुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो. जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो असे आढळले.
-शेतीवर पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी पूरक व्यवसायांची जोड देण्याची गावातील तरुणांची मानसिकता आहे. पाच- सहा तरुणांनी देशी कुक्कुटपालन सुरू केले आहे. गावरान अंडी, कोंबड्यांची स्थानिक बाजारात विक्री केली जात असून, त्यातून नियमित उत्पन्न मिळत आहे. मधुमक्षिका पालन, शेळीपालनालाही मिळाली दिशा.
-गावातील १० तरुणांनी स्थापन केली श्रीवल्ली शेतकरी कंपनीची स्थापना. गावातील वाढत्या संत्रा क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया केंद्र, प्रतवारी, पॅकिंग आदींच्या माध्यमातून मूल्यसाखळी उभारण्याचे कंपनीचे उद्दीष्ट. हा प्रयत्न भविष्यात गावातील फळ उत्पादकांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
बदललेले कानशिवणी
कानशिवणी शिवारात २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत खोलीकरणाची कामे झाली. त्यातून पावसाचे पाणी जमिनीत जिरले. भूजल पातळी वाढली. काही शिवारांमध्ये विहिरींची पाणी पातळी २५ ते ३० फुटांपर्यंत वाढली. अनेक शेतकरी दुबार पिके घेऊ लागले. आधुनिक तंत्रज्ञान, पट्टा पद्धत, गादीवाफा पद्धतीचा अवलंब केला. त्यातून उत्पादनात वाढ झाली. उदाहरण सांगायचे तर पूर्वी सोयाबीनचे एकरी ६ ते ७ क्विंटल मिळणारे उत्पादन १० ते १२ क्विंटलपर्यंत पोहोचले आहे.
पन्नास ते ६० एकरांवरील भेंडी, वांगी, मिरची, टोमॅटो, कारले आदी भाजीपाला पिके शेतकऱ्यांना ताजा पैसा मिळवून देत आहेत. स्थानिकांसह अकोला येथील बाजारपेठ त्यांना मिळाली आहे. गावातच वाहतुकीसाठी छोटी वाहने उपलब्ध झाली आहेत. त्यातून स्थानिक रोजगार निर्माण झाला आहे.
आर्थिक सक्षमता आली
आज गावातील शेतकरी कुटुंबाचे अर्थकारण उंचावले आहे. पुढील भांडवल व दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आर्थिक सक्षमता मिळाली आहे. काहींनी शेतीतील उत्पन्नातून यांत्रिकीकरण केले आहे. चेतन पंडागे यांनी शेती उत्पन्न आणि बँकेच्या आर्थिक साह्यातून चार पोकलेन यंत्रे घेतली आहेत. अन्य शेतकऱ्यांनीही अशी यंत्रे घेत गावात त्यांची संख्या नऊपर्यंत पोहोचली आहे. गावात तीन हार्वेस्टर्स, आठ ते दहा ट्रॅक्टर्स आणि ट्रॅक्टरचलित यंत्रे दृष्टीस पडतात. एका शेतकरी गटाने गटशेती योजनेतून ट्रॅक्टर घेतला आहे. अनेक कुटुंबांनी सिमेंटची घरे उभी केली आहेत. काहींची घरांची कामे सुरू आहेत. पूरक व्यवसायांकडे कल वाढला आहे. गणेश हत्तीमारे या तरुणाने आपल्या दोन एकर शेतीला शेळीपालन, कुक्कुटपालनाची जोड दिली आहे. मंगेश बंड, उमेश वाघमारे, अक्षय निमकंडे आणि गणेश वाघमारे देशी कुक्कुटपालनात गुंतले आहेत. त्याद्वारे गावात दररोज २०० ते ३०० गावरान अंडी उपलब्ध होत आहेत. त्यातून नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे.
कानशिवणी- ठळक वैशिष्ट्ये
-अकोला जिल्ह्यातील परिसरातील मध्यवर्ती गाव. आठ ते दहा लहान गावे त्याच्याशी जोडली आहेत.
- पुरातन गरुडेश्वर मंदिर, संत गजानन महाराज मंदिर यांचे मंदिर. गावकऱ्यांच्या श्रद्धेची ती महत्त्वाची केंद्रें.
- बस स्थानकाजवळ भव्य ग्रामपंचायत इमारत.
- पीएम श्री योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळा (इयत्ता १ ते ६) कार्यरत.
- संत गजानन महाराज चौकात आधुनिक व्यापारी संकुल. छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या तरुणांच्या हाताला त्यातून मिळाला रोजगार.
-गोपालकृष्ण गोसेवा केंद्र कार्यरत. दीडशेहून अधिक गाईंचे संगोपन.
- युवकांसाठी पोलिस, सैन्य व निमलष्करी दलांच्या भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा. ठिकठिकाणाहून येथे येतात तरुण-तरुणी.
-लोकसहभागातून तयार झाले काही शेतरस्ते. अर्थात, बारमाही शेतरस्त्यांची अडचण काही शिवारांत कायम. त्याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज ग्रामस्थांकडून होतेय व्यक्त.
नारायण पंडागे, ८८८८४८१८२८
(गावातील प्रगतिशील शेतकरी)
-अशोक करवते, ९४२१२७४०१०
(सहायक कृषी अधिकारी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.