चिमुकलीला ब्लड कॅन्सर; तरुणांनी केली आर्थिक मदत

संतोष आटोळे
Tuesday, 21 April 2020

- चिमुकलीच्या जगण्याच्या लढाईला पारवडीतील दिलदार तरुणांची साथ
उपचारासाठी केली आर्थिक मदत

शिर्सुफळ : एकीकडे कोरोनाच्या धास्तीने सर्वत्र लाॅकडाऊन सुरु असताना अनेकजण इतर आजारानेही ग्रासले आहेत. अशातच पारवडी (ता.बारामती) येथील नऊ वर्षाची चिमुकली तन्वी सुरेश लांडगे ही ब्लड कॅन्सरशी लढा देत आहे. आर्थिक अडचणींमुळे तिच्या उपचारावर मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर गावातील तरुणांनी एकत्र येत सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन केले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. एकप्रकारे या मदतीतून चिमुकलीच्या या जगण्याच्या लढाईला पारवडीतील होतकरू तरुणांची साथ मिळाली.

येथील राहुल रमेश बेंगारे,पांडुरंग शिपकुले, नंदकुमार नगरे,संदिप गवंड तसेच त्यांच्या पारवडी जंजिरा जायन्टस क्रिकेट क्लब टीममधील सदस्यांना तन्वीच्या आजाराबाबत व उपचारामध्ये येत असलेल्या अडचणींची माहिती समजली. यावर त्यांनी फक्त दुख व्यक्त न करता यामध्ये कशा पद्धतीने मदत करता येईल. यादृष्टीने प्रयत्न केले.व सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत संकलित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी गावातील समाजाप्रती देणे असलेल्या अनेकांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेऊन या चिमुकलीच्या उपचाराकरिता अवघ्या तीन ते चार दिवसांमध्ये 68 हजार रुपये जमा झाले. यामुळे आर्थिक बाजूने खचलेल्या तन्वीच्या आईवडीलांना उपचारासाठी मदत मिळाली.

दवाखान्याचा खर्च करणे अशक्य असलेल्या माता पित्यांना तरुणांच्या मदतीने अश्रु अनावर झाले. संबंधित रकमेचा धनादेश त्यांच्या देण्यात आला. यावेळी गावचे पोलिस पाटील धनंजय शिंदे, आरोग्य विभागाचे कर्मचारी मकानदार, चव्हाण, ग्रामसेवक सतिश बोरावके, बाप्पू नांगरे, सनी आटोळे,निलेश नगरे,गजानन लोखंडे, दिपक लांडगे, हे उपस्थित होते.

लढाई अजून संपलेली नाही

तन्वीच्या उपचारासाठी तब्बल तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील रक्कम पारवडीतील तरुणाच्या सामाजिक बांधिलकीतून मिळाली आहे. मात्र, तन्वीच्या उपचारासाठीची आर्थिक लढाई सुरु राहणार आहे. यासाठी समाजातील दानशुरांनी राहुल बेंगारे (99601 69901) यांच्याशी संपर्क साधण्याचे गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Financial Help to Blood Cancer Infected Girl