
पुणे - आलिशान कार मधून येत येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून लघुशंका आणि अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाने पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने त्याच्या कारची नंबरप्लेट काढली व तिची विल्हेवाट लावली आहे. त्याच्या कारमध्ये दारूची बाटली आणि ग्लास आढळले असून पोलिसांनी कार व त्यातील वस्तू जप्त केल्या आहेत.
पुण्यातून पसार झाल्यानंतर गौरव मनोज आहुजा (वय-२५, रा. साठे कॉलनी, टिळक रस्ता) हा कोल्हापूरला गेला होता. त्याने त्याची कार तेथे लावली व तेथून तो पुण्यात आला, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. गाडी पार्क केल्यानंतर त्याने कारची नंबरप्लेट काढून पुरावा नष्ट केला आहे.
अज्ञात इसमाने व आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी गुन्ह्यातील पुरावा नाहीसा करण्याचे उद्देशाने नंबरप्लेटची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या गुन्ह्यात पुरावा नष्ट केल्याचे कलम वाढविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी (ता. १०) न्यायालयास दिली. आरोपींनी अमली पदार्थाचे सेवन केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
तरुणांनी शुक्रवारी रात्रभर कोरेगाव पार्क मुंढवा रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये पार्टी केली. तेथील सीसीटीव्हीचे चित्रीकरण पोलिसांनी तपासले आहे. पोलिस निरिक्षक (गुन्हे) विजय ठकार या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
गौरवच्या कोठडीत वाढ भाग्येशला न्यायालयीन कोठडी -
पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश प्रकाश ओसवाल (वय-२२, रा. प्राइड हाइट्स सोसायटी, मार्केटयार्ड) यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्हा करण्यापूर्वी आरोपी कोठे-कोठे गेले होते? कोणत्या ठिकाणावर त्यांनी अमली पदार्थ अथवा मद्य पिलेले होते? याबाबतची माहिती आरोपींकडून घेण्याची आहे.
गौरव याने गुन्हा केल्यानंतर जप्त केलेल्या कारपासून तो कसा, कोणत्या मार्गे आणि कोणासोबत परत आला याबाबत तपास करण्यात येत आहे. या गुन्ह्यामध्ये व गुन्हा केल्यानंतर पळून जाण्यामध्ये आरोपीला कोणी मदत केली होती? याबाबत माहिती जमा करण्यात येत आहे.
त्यामुळे आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील योगेश कदम यांनी केली. बचाव पक्षातर्फे ॲड. पुष्कर दुर्गे आणि ॲड. सुनील रामपुरे यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांनी गौरव याच्या पोलिस कोठडीत एका दिवसाची वाढ केली. तर भाग्येश याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
आरोपींना नेले होते घटनास्थळी -
सोमवारी दोन्ही आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले होते. घटना नेमकी कशी घडली? व त्यात आरोपींची काय भूमिका होती? याचा तपास पोलिसांकडून करण्यात आला. तसेच घटनास्थळाची पडताळणी करण्यात आली, अशी माहिती येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.