खडकवासला - धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांचे जीवन जगण्यासाठी दिशा देणारे आहे. तरुणांच्यातील वाढते नैराश्य, वाढती व्यसनाधीनता कमी करणे हे यंदाच्या धर्मवीर बलिदान मासचा उद्देश आहे. आज बुधवार पासून कोंढवे- धावडे येथे बलिदान मास सुरु झाला आहे.
धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांची पुण्यतिथी फाल्गुन अमावस्या दि. २९ मार्च २०२५ रोजी आहे. त्यापुर्वी, ४० दिवस अगोदर धर्मवीर बलिदान मास पाळला जातो. त्यांची आज सुरुवात झाली. शिवशंभु राजे प्रतिष्ठाणच्या वतीने कोंढवे- धावडे येथील श्रीकोंढवेश्वर मंदिर येथे दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ ते फाल्गुन अमावस्या २९ मार्च २०२५ पर्यंत ४० दिवस रोज सकाळी सव्वा सात वाजता छत्रपती श्रीसंभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि स्मरण केले जाणार आहे. या उपक्रमात शिवभुमी भ्रमंती ग्रुप, उत्तमनगर बजरंग दल, कोंढवे धावडे, कोपरे, उत्तमनगर, शिवणे येथील समस्त ग्रामस्थ दररोज उपस्थित राहणार आहे.
औरंगजेबाने छत्रपती शंभुराजांना ४० दिवस वेदना देऊन हत्या केली. याची या महिन्यात जाणीव रहावी. म्हणून आवडीच्या वस्तूं गोड पदार्थांचा त्याग केला जातो.
औरंगजेबाने छत्रपती शंभूराजांची ४० दिवस वेदनाकारक रित्या हत्या केली होती. म्हणून या कालावधीत संपूर्ण महिना सुखाचा त्याग करीत सूतकाचा महिना पाळला जातो. या दरम्यान, ४० दिवस गोड खायचे नाही. पायात चप्पल घालायचे नाही. जमिनीवर झोपायचे. अशा कृतीतून श्रदांजली व बलिदान मास पाळला जातो. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, युवती, महिला शिवप्रेमींनी यामध्ये सहभागी व्हावे. आणि रोज अभिवादन सभेला उपस्थित राहावे. असे आवाहन सुनीत लिंबोरे यांनी केले आहे.
सध्या तरुणांच्यात परिक्षा, नोकरी, व्यवसाय, अपेक्षा, व्याधी आजारपण यातून आलेले नैराश्य, विविध प्रकारची व्यसनाधीनता झटकण्यासाठी बलिदान मास हे प्रभावी आहे. धर्मवीर बलिदान मास हिंदू समाजाला अंतरमुख करणारा, क्लेशकारक, दुःखदायक मास आहे. छत्रपती शंभू महाराज यांच्याएवढे दु:ख आपल्या जीवनात नाही. या बलिदान मास यातून देशासह प्रगतीला आणि कुटुंबिक जीवन आनंदी जगण्यासाठी सुरू करण्याची हीच वेळ आहे. याकाळात तरुणांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहासाचे वाचन करावे.
- अशोक सरपाटील, इतिहास अभ्यासक
औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा ४० दिवस शारीरिक छळ करून त्यांची क्रुरहत्या केली. स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी राजे मोठ्या धीराने मृत्यूला सामोरे गेले. मराठ्यांना या पराक्रमी शिवपुत्राचे अंत्यदर्शन ही घेता आले नाही. त्यांचे अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आले नाही. त्या भावनेतून हा बलिदान मास पाळला जातो. स्वतःच्या शरीराला क्लेश करून, आपल्या राजाला श्रद्धांजली वाहण्याचा हा मार्ग आहे. अनेक शिवभक्त, युवक आणि युवती या काळात याचे आचरण करतात. हे खूप प्रेरणादायी आहे. छत्रपतींची शक्ती आणि मावळ्यांची छत्रपतींची प्रती असलेली भक्तीनिष्ठा ही व्यक्त करण्याची ही मोठी संधी आहे. हीच खरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली आहे.
- डॉ. नंदकिशोर मते, इतिहास अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.