उस्ताद झाकीर हुसेन यांना एस डी बर्मन अवॉर्ड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

पिफचे हे 15 वर्ष "अधिक चित्रपट, अधिक विविधता, सखोलता आणि अधिक मनोरंजन करणारे असेल,' असा आशावाद पिफ संचालक व ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बर पटेल यांनी व्यक्त केला आहे

पुणे - 15 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अपर्णा सेन व ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर, संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांना "एस.डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव अवॉर्ड' जाहीर झाला आहे. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अपर्णा सेन प्रतिथयश अभिनेत्री, चित्रपट निर्मात्या असून त्यांना "पद्मश्री' पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. याशिवाय त्यांना चित्रपट क्षेत्रामधील राष्ट्रीय पातळीवरील तीन पुरस्कार मिळाले आहेत. तीन कन्या (1961) या चित्रपटामधून पदार्पण करणाऱ्या सेन यांनी अपरिचितो या चित्रपटामधून जाणकारांचे लक्ष वेधून घेतले होते. यानंतर 60, 70 व 80 च्या दशकांत बंगाली चित्रपट क्षेत्रांत त्यांनी विविध भूमिका साकारत दर्जेदार अभिनयाची छाप पाडली. याचबरोबर, 36 चौरंगी लेन या चित्रपटासाठी 1981 मध्ये त्यांना राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम दिग्दर्शकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

महोत्सवाचे उद्घाटन येत्या 12 जानेवारी रोजी दुपारी 4.30 वाजता सिटी प्राइड (कोथरूड) चित्रपटगृहामध्ये होणार आहे. पिफचे हे 15 वर्ष "अधिक चित्रपट, अधिक विविधता, सखोलता आणि अधिक मनोरंजन करणारे असेल,' असा आशावाद पिफ संचालक व ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बर पटेल यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: zakir hussain to receive "s d burman' creative award