Pune News : समाविष्ट गावातील शाळांची स्थिती "घर का ना घाट का' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

zilla parishad school municipal corporation hadapsar no Repair of school buildings

Pune News : समाविष्ट गावातील शाळांची स्थिती "घर का ना घाट का'

हडपसर : समाविष्ट गावातील जिल्हा परिषद शाळांचे अद्यापही प्रत्यक्षात महापालिकेत समायोजन झालेले नाही. विद्यार्थी व शिक्षकांना इमारत, मैदानाच्या देखभालीसह विविध मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाकडून दिली जाणारी सेवा गावांच्या पालिका समावेशाबरोबरच बंद झाली आहे. मात्र, त्यानंतर पालिकेकडून अजूनही अशी सेवा दिली जात नाही. त्यामुळे या शाळांची परिस्थिती सध्या "घर का ना घाट का' अशी झाली आहे.

पाच वर्षांपूर्वी अकरा तर दीड वर्षांपूर्वी तेवीस गावांच्या महानगरपालिकेतील समावेशाबरोबर या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळाही पालिकेत समाविष्ट करण्यात आल्या. येथील ग्रामपंचायत प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा पालिका प्रशासनाने ताब्यात घेतल्या मात्र पालिका प्रशासनाकडून या शाळांना ना सुविधा ना सेवा दिली जाते. यातील अनेक शाळा इमारतींची देखभाल दुरुस्ती होऊ शकली नाही.

समाविष्ट एकूण चौतीस गावांमधील अनेक शाळांच्या इमारती दुरूस्तीला आलेल्या आहेत. नादुरुस्तीमुळे चोऱ्या होत आहेत. रंगरंगोटी रखडली आहे. मैदानांवर झाडेझुडपे वाढली आहेत. क्रिडांगणांची देखभाल होत नाही. वेळेवर पाणी मिळत नाही. स्वच्छतागृहे नादुरुस्त झाली आहेत. पाण्याविना दुर्गंधी पसरली आहे. महिला शिक्षकांची यामुळे कुचंबणा होत आहे.

या शाळा अद्याप पालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत झालेल्या नसल्याने त्यांच्या विकासासाठी निधीची उपलब्धता करता येत नाही. काही किरकोळ कामे क्षेत्रीय स्तरावरून केली जात असल्याचे विविध क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांकडून सांगितले जात आहे.

"मांजरी बुद्रुक गावात सहा शाळा आहेत. पालिकेकडून शाळेला कुठल्याही सुविधा पुरविल्या जात नाहीत. स्वच्छतागृहात पाणी नाही. ती मोडकळीस आली आहेत. विद्यार्थ्यांना उघड्यावर तर शिक्षकांना पालिका कार्यालयात लघुशंकेसाठी जावे लागते.

मैदानावर झाडेझुडपे वाढली आहेत. पालिकेकडे गेटच्या चाव्या आहेत. कर्मचारी वेळेवर येत नसल्याने गेट उघडले जात नाही. त्यावेळी पोलीस चौकीच्या आवारातून आडमार्गाने धोकादायकपणे शाळेत यावे लागते. पालिका अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही लक्ष दिले जात नाही.'

- अनील गौड मुख्याध्यापक, मांजरी बुद्रुक प्राथमिक शाळा

"शाळेसाठी सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचारी नसल्याने शिक्षकांना त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पाठपुरावा करावा लागत आहे. शाळेचे छत व स्वच्छतागृहे दुरुस्ती रखडली आहे. वीज बीलासाठी अनुदानाची वाट पाहवी लागत आहे. वीज तोडली जाऊ नये म्हणून मला खिशातून खर्च करावा लागत आहे. वर्गणी गोळा करून स्वच्छता ठेवावी लागत आहे.'

- अमोल भाटी मुख्याध्यापक, फुरसुंगी प्राथमिक शाळा

"सध्या या शाळांना जिल्हापरिषदेकडून शैक्षणिक सुविधा पुरविल्या जात आहेत. भौतिक सुविधा त्या त्या ग्रामपंचायतकडून पुरवल्या जात होत्या. पालिकेकडून मात्र, त्या मिळत नाहीत. ज्या शाळांना काही सुविधा आवश्यक वाटतात त्यासाठी प्रस्ताव दिल्यास कार्यवाही करता येईल.'

- निलिमा म्हात्रे गट शिक्षण अधिकारी, हवेली तालुका

  • समाविष्ट गावातील शाळांची संख्या : ६१

  • विद्यार्थी संख्या : सुमारे ३० हजार

  • शिक्षक संख्या : ४२७