झिरम घाटी हल्ला प्रकरणात सर्व १० आरोपी दोषी

झिरम घाटी हल्ला प्रकरणात सर्व १० आरोपी दोषी
Published on

विद्याचरण शुक्लांसह २९ जणांच्या
हत्येप्रकरणी दहाही आरोपी दोषी
विशेष न्यायालयाचा निकाल; झिरम खोऱ्यात नक्षलवाद्यांनी घडवला होता हल्ला
जगदलपूर (छत्तीसगड), ता. ५ (पीटीआय) : २०१३ मध्ये छत्तीसगडच्या झिरम खोऱ्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ला प्रकरणी विशेष न्यायालयाने शनिवारी सर्वच्या सर्व दहा आरोपींना दोषी ठरविले. या हल्ल्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विद्याचरण शुक्ल, महेंद्र कर्मा यांच्यासह २९ जणांचा मृत्यू झाला होता. शिक्षा १६ सप्टेंबरला जाहीर होणार आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) प्रकरणांसाठीच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अजयसिंह राजपूत यांनी शिक्षेवरील आदेश राखून ठेवला. या खटल्यात सुरुवातीला ११ आरोपी होते. त्यापैकी एकाचा खटला सुरू असताना मृत्यू झाला. दोषींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. खटल्यादरम्यान न्यायालयाने १०१ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. प्रमिला मोडियाम, चैतू लेकाम, सुमित्रा पुनेम मोडियाम, मुका मंडावी, कोसा कवासी, आयता मरकाम, मडकम देव्हा, जोगा मडकम, बंजामी सन्ना आणि महादेव नाग अशी दोषी ठरविण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, आरोपींचे वकील अरविंद चौधरी यांनी या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले.
काय आहे झिरम खोरे हल्ला?
छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने काढलेल्या ‘परिवर्तन रॅली’वर २५ मे २०१३ रोजी झिरम खोऱ्यात नक्षलवाद्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा दिनेश, माजी विरोधी पक्षनेते महेंद्र कर्मा, माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल तसेच ज्येष्ठ नेते व माजी आमदार उदय मुदलियार यांच्यासह २९ जणांचा मृत्यू झाला. तसेच तीसहून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर तत्कालीन रमणसिंह सरकारने दोन दिवसांत तपास एनआयएकडे सोपविला. एनआयएने २०१४ मध्ये अटक केलेल्या नऊ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर २०१५ मध्ये ३० आरोपींविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने या हल्ल्यामागील मोठ्या कटाचा तपास एनआयएने केलेला नसल्याचा दावा करत विशेष तपास पथक स्थापन केले. या प्रकरणी २०२० मध्ये नव्याने गुन्हाही दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com