

झेडपी शाळांची वीजबिले ग्रामपंचायतींकडेच
१५ व्या वित्त आयोग, स्वनिधीतून खर्चाच्या सूचना; अन्यथा ग्रामसेवकांवर कारवाई
रूपेश कदम : सकाळ वृत्तसेवा
दहिवडी, ता. १४ : सातारा जिल्हा परिषदेच्या शाळांमधील थकीत वीजबिलांचा प्रश्न आता गंभीर झाला असून, ही बिले ग्रामपंचायतींनी १५ व्या वित्त आयोग किंवा स्वनिधीतून खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही बिले तातडीने न भरल्यास संबंधित ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या बहुतांशी शाळा डिजिटल झाल्या आहेत. स्मार्ट बोर्ड, डिजिटल टी. व्ही., संगणक कक्ष आदी बाबींनी परिपूर्ण बनल्या आहेत. मात्र, वीजबिल थकल्याने अनेक शाळांच्या वीज जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने ही सर्व उपकरणे कुचकामी ठरली आहेत. यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, ही बिले ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडील १५ व्या वित्त आयोग किंवा स्वनिधीतून भरणे अनिवार्य होते. मात्र, वारंवार सूचना देऊनही अद्याप अनेक शाळांची बिले थकीतच आहेत. १३ मेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अनिल देसाई यांनी हा विषय उचलून धरल्याने या विषयावर सविस्तर चर्चा झाली. यावर जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले सर्व सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सकारात्मक निर्णय घेतला. यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठवून सूचना दिल्या आहेत.
थकीत बिलांसाठी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर वित्तीय नियमांचे पालन करून करायचा आहे. तालुक्यातील १०० टक्के शाळांची वीजबिले भरल्याबाबतचा अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्याकडे सादर करायचा आहे, तसेच ज्या ग्रामपंचायती वीजबिले अदा करणार नाहीत, अशा ग्रामपंचायती आणि ग्रामसेवकांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करायची आहे.
या निर्णयामुळे आता ग्रामपंचायत स्तरावर हालचाली वाढणार असून, शाळांचा वीजपुरवठा खंडित होण्यापासून वाचवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न चालवले आहेत.
.............................
आधुनिक पद्धतीने प्राथमिक शिक्षण घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांनी आधुनिकीकरण अंगीकारले आहे. मात्र, थकीत वीजबिलांमुळे यामध्ये व्यत्यय येत आहे. याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन योग्य पावले उचलली आहेत. त्यामुळे थकीत बिलापोटी वीजपुरवठा खंडित होणार नाही.
- अनिल देसाई,
जिल्हा परिषद सदस्य.
.........................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.