
शेअर बाजाराचा मूड गेले चार महिने नाराज आहे. कळत-नकळत देशी (अधून मधून परदेशी) गुंतवणूकदारांच्या अलोट प्रेमामुळे ‘कोविड’नंतर जी तेजी आली, ती जणू संपलीच नाही. परदेशी गुंतवणूकदार साडेतीन लाख कोटींचे शेअर विकून गेले तरी शेअर बाजाराने मागे वळून पाहिले नाही. २०२० नंतर आलेल्या तेजीवाल्यांच्या नव्या पिढीने तर खरी मंदी पाहिलेलीच नाही. आता कुठे चिंतेची एक लहर बाजारात आली होती. पुढे काय, ही भीती भेडसावत असताना अर्थसंकल्प सादर झाला आणि बाजारात पुन्हा चैतन्य संचारते की काय असे वाटू लागले. पण हाय रे नशिबा! ते आज तरी होताना दिसत नाही.