
विद्याधर अनास्कर
v_anaskar@yahoo.com
नागरी सहकारी बँकांचा सर्वांत चांगला उपयोग हा तळागाळातील अनुत्पादक पैसा अर्थव्यवस्थेमध्ये आणण्यासाठी होत असतो. आजही ग्रामीण भागामध्ये आर्थिक साक्षरतेच्या अभावामुळे अनेक जण बँकिंग प्रणालीपासून दूर आहेत. या सर्वांना बँकिंग प्रणालीमध्ये आणण्याचे अवघड काम सहकारी बँकिंगचे क्षेत्र करत आहे.
नुकत्याच बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप (BCG), फिक्की (FICCI) आणि इंडियन बँक असोसिएशन (IBA) यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘Charting New Frontiers’ या अहवालात, विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी बँकिंग क्षेत्राची वाढ, एकूण देशांतर्गत उत्पादनापेक्षा (जीडीपी) गतिमान राहिली पाहिजे, असे नमूद केले आहे. या अहवालानुसार बँकिंग क्षेत्राने जीडीपीपेक्षाही ३ ते ३.५ टक्के जास्त वेगाने प्रगती करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली आहे.
जीडीपी म्हणजे देशात एका वर्षात निर्माण होणाऱ्या वस्तु व सेवांची एकूण किंमत. ही किंमत वाढली म्हणजे देश समृद्ध होत आहे, असे मानले जाते. परंतु, उत्पादन, गुंतवणूक, उद्योगधंदे किंवा पायाभूत सुविधा यासाठी लागणारा पैसा हा बँकिंग प्रणालीमार्फत उपलब्ध होत असतो. त्यामुळे बँकिंग क्षेत्राच्या वाढीचा दर हा जीडीपीवाढीच्या दरापेक्षा जास्तच असला पाहिजे, हे संयुक्तिकच आहे.
समाजातील अनुत्पादक पैसा स्वत:च्या माध्यमातून उत्पादकतेकडे वळविण्याचे महान कार्य बँका करीत असतात. आजही देशात ४० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांना बँकिंगच्या सवयी नाहीत. आजही ग्रामीण भागामध्ये आर्थिक साक्षरतेच्या अभावामुळे अनेक जण बँकिंग प्रणालीपासून दूर आहेत. या सर्वांना बँकिंग प्रणालीमध्ये आणण्याचे अवघड काम सर्वांत जास्त उत्तमपणे कोण करू शकत असेल, तर सहकारी बँकिंगचे क्षेत्र होय.