
सुनील बक्षी
bakshies@gmail.com
सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या चिंताजनक आहे. नागरिकांसाठी सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी २०२१ मध्ये १९३० नंबर उपलब्ध करून देण्यात आला. तेव्हापासून त्यावर देशभरातून ९.९ लाख तक्रारी आल्या, अशी माहिती १० डिसेंबर रोजी लोकसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री बी. संजय कुमार यांनी दिली.
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, देशभरातून आलेल्या एकूण तक्रारींपैकी सुमारे आठ टक्के तक्रारी एकट्या मुंबई शहरातील होत्या. मुंबई शहरातून नोव्हेंबर २०२४ पर्यंत ५५,७०७ पीडितांनी ११८१.४३ कोटी रुपये गमावल्याची नोंद केली, जी २०२३ च्या तुलनेत तिपटीने वाढली आहे. २०२३ मध्ये १८,२५६ लोकांनी २६२.५१ कोटी रुपये गमावल्याची तक्रार केली होती. पुण्याची परिस्थितीदेखील काही वेगळी नाही. २०२४ या वर्षाच्या अखेरपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षात सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यात चौपट वाढ झालेली दिसते. गेल्या वर्षी ७५,८०० गुन्हे नोंदवले गेले होते, तर यावर्षी आतापर्यंत जवळजवळ तीन लाख गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षात ४२४ कोटी रुपये गुन्हेगारांनी लुबाडले, तर यावर्षी हीच रक्कम २१०० कोटी रुपयांच्या आसपास पोहोचेल.