
अॅड.सुकृत देव - करसल्लागार
सध्या जागतिक पातळीवर युद्धाचे सावट आहे, रशिया-युक्रेनमधील युद्ध, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणावाचे वातावरण, अमेरिकेने लादलेल्या आयातशुल्कामुळे सुरू झालेले व्यापारयुद्ध. अशा परिस्थितीमुळे आर्थिक अस्थिरतेने जगाला ग्रासले आहे. आयातशुल्काच्या निर्णयामुळे अमेरिकेमध्ये महागाई वाढली आहे, मंदी येण्याची शक्यता आहे. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने ‘जीडीपी’ दर, महागाईदर, दरडोई उत्पन्न, खर्च, आयात-निर्यात आदी सर्व बाबी नियंत्रणात ठेवल्या आहेत, तरीही जागतिक अस्थिरतेत उद्भवणाऱ्या आकस्मिक संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज असणे आवश्यक आहे. त्यासाठी गरजेचे आहे ते आर्थिक नियोजन. आर्थिक नियोजनामुळे कोणत्याही आर्थिक प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे शक्य होते.