
‘जीएसटीमुक्ती’चा दिलासा: विमा धारकांसाठी मोठा दिलासा!
ई सकाळ
From 18% to 0%: India’s Bold GST Reform in the Insurance Sector
नीलेश साठे
nbsathe@gmail.com
केंद्र सरकारने वस्तू आणि सेवाकराच्या दरात (जीएसटी) नुकतेच लक्षणीय बदल केले आहेत. वैयक्तिक विमा पॉलिसींवरील ‘जीएसटी’ गेल्या २२ सप्टेंबरपासून शून्य करण्यात आला आहे. म्हणजेच आता वैयक्तिक विम्यावर कोणताही ‘जीएसटी’ आकारला जाणार नाही. विमा नियामक व विकास प्राधिकरणाचा (इर्डा) सदस्य असल्यापासून मी याचा आग्रह धरला होता. आता अपेक्षित बदल झाला आहे. ही अतिशय सकारात्मक बाब आहे.
वैयक्तिक विमा पॉलिसींवरील वस्तू व सेवाकर (जीएसटी) गेल्या २२ सप्टेंबरपासून शून्य करण्यात आला आहे. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. विम्यावर ‘जीएसटी’ लागू होण्याआधी आठ वर्षांपासून सेवाकर अस्तित्वात होता.
प्रथम ८ टक्के, नंतर १० टक्के व नंतर १२ टक्के असा तो वाढत गेला आणि ‘जीएसटी’ येण्यापूर्वी तो १५ टक्के होता. ‘जीएसटी’ अंमलबजावणीच्या पूर्वीपासून सरकारने विमा हप्त्यावर सेवाकर लादला होता. ‘जीएसटी’ आल्यावर, तर त्या १५ टक्क्यांचा दर १८ टक्क्यांवर गेला. आता आपण उदाहरणादाखल हिशेब करू या.
समजा, एखाद्याने दीड लाख रुपयांचा आरोग्य विमा घेतला आणि त्याचा हप्ता अंदाजे १० हजार किंवा १५ हजार रुपये येत असेल, तर त्यावर १८०० ते २००० रुपये करापोटी द्यावे लागत आहेत. दहा वर्षांत तुम्ही १.८० लाख रुपये भरले, तरी दाव्याची भरपाई करताना विमा कंपनी मात्र तुम्हाला आश्वासित रक्कम म्हणजे दीड लाख रुपयेच देणार आहे. तेथे करांसहित वाढीव रक्कम भरल्याचा युक्तिवाद चालत नाही.