

ट्रम्पच्या ‘टेरिफ बॉम्ब’चा भारतीय अर्थव्यवस्थेवर किती परिणाम?
E sakal
डॉ. मयुरेश रावेतकर
Mayuresh@bowealth.com
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर ‘टेरिफ बॉम्ब’ फोडायला सुरुवात केली. रशिया-युक्रेन युद्ध, इस्राईल-हमास युद्ध यामुळे अर्थव्यवस्थेच्या अस्थिरतेत आणखी भर पडली. अशा जागतिक आव्हानांचा सामना करत भारतीय अर्थव्यवस्था उत्तम वाटचाल करत आहे. मात्र, जागतिक अस्थिरतेचा भारतीय गुंतवणूकदारांवर काय परिणाम होत आहे, याचा वेध.
गेली दोन ते तीन वर्षे रशिया-युक्रेन आणि इस्राईल-हमास युद्धे यामुळे आधीच जागतिक अस्थिरता वाढलेली असताना, नाटो सदस्य देश मेटाकुटीला आलेले असताना, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकलेल्या ‘टेरिफ बॉम्ब’मुळे जागतिक अस्थिरतेत भर घातली. जागतिक राजकारण आणि अर्थकारण यात परिवर्तनाला सुरुवात झाली. या पाठोपाठ भारत-पाकिस्तान यांच्यात झालेला संघर्ष, इराणवर अमेरिकेने केलेली कारवाई यामुळे पश्चिम आशिया ढवळून निघाला. अर्थात, भारताने पाकिस्तानविरुद्ध आपली स्वयंसिद्ध ताकद दाखवून जगाला आश्चर्यचकित केले; पण इथूनच सर्व चक्रे फिरली आणि अमेरिकेने अचानकपणे आपला रोख हा फक्त भारताकडे वळवला.