
When the World Trembles, India Stands Tall
डॉ. अनिल धनेश्वर
anil.dhaneshwar@gmail.com
आजच्या घडीला जगात १९५ देश आहेत. त्यापैकी पॅलेस्टाइन आणि व्हॅटिकन सिटी हे दोन देश सोडून १९३ देश युनायटेड नेशन्स अर्थात संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने वेळोवेळी प्रस्तावित केलेल्या निर्देशांचे पालन सर्व सदस्य देशांनी करणे अपेक्षित असते; पण हे निश्चितपणे घडतेच असे खात्रीने सांगता येत नाही. संयुक्त राष्ट्रसंघावर अमेरिका, तसेच विकसित, सधन पाश्चिमात्य देशांचा प्रभाव आहे. त्याशिवाय आर्थिक एकात्मतेच्या पातळीनुसार, व्यापार गटांचे वर्गीकरण पाच प्रकारात केले जाते.
ते प्रकार असे- प्राधान्य व्यापार क्षेत्रे, मुक्त व्यापार क्षेत्रे, सीमाशुल्क संघटना, सामान्य बाजारपेठ किंवा आर्थिक आणि आर्थिक संघटना. संघटित सदस्य देश कोणत्याही परिस्थितीत एकमेकांचे व्यावसायिक हित सांभाळण्याचे काम करत असतात; पण जेव्हा जगात युद्धाची परिस्थिती उद्भवते, तेव्हा मात्र आर्थिक संकट, तसेच जागतिक व देशांतर्गत मंदी येण्याची शक्यता अटळ असते.
आज जग अस्थिर आर्थिक परिस्थितीमधून जात आहे. जगात आज आहेत तेवढ्या बिकट व्यापारी आणि आर्थिक समस्या कधीही, कोणत्याही देशाला आल्या नव्हत्या. जगातील सर्वच्या सर्व १९५ देश त्या समस्यांचा कमी-अधिक परिणाम भोगत आहेत.
या संकटाचे निवारण केव्हा होईल, हे आज सांगता येत नाही. प्रत्येक देशाने आपापले बघून घ्यावे आणि नक्की कोणावर विश्वास ठेवावा, हेदेखील खात्रीने सांगता येत नाही.