
राजेंद्र पारखी
rajendra_parakhi@yahoo.co.in
आपल्या देशातील बुद्धिमान तरुणाईला व्यवसायात उतरण्याची प्रेरणा देऊन रोजगारनिर्मिती, संपत्तीनिर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने दहा वर्षांपूर्वी ‘स्टार्ट-अप इंडिया’ हा उपक्रम सुरू केला. यात सरकारने स्टार्ट-अपना यशस्वी होण्यासाठी विविध प्रकारे मदत उपलब्ध केली आहे.
त्यामुळे विविध क्षेत्रातील स्टार्ट-अप देशात उभे राहिले असून, जगभरात भारताचा स्टार्ट-अप क्षेत्रात दबदबा निर्माण झाला आहे. स्टार्ट-अपची संकल्पना नवी होती, तेव्हा जगभरातील गुंतवणूकदार भारतातील स्टार्ट-अपबाबत उत्साही होते.
नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित स्टार्ट-अप वेगाने निर्माण होत होते आणि मोठ्या प्रमाणात फंडिंग मिळवत होते. मात्र, कोविड महासाथीनंतर अर्थव्यवस्था जोखीम घेण्यासाठी तयार नसल्याने परिस्थिती बदलली.
या काळात डिजिटायझेशनचा वेग मंदावला, जगभरातील मध्यवर्ती बँकांनी स्वस्त कर्जपुरवठा घटवला. त्यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आणि स्टार्ट-अपना मिळणारा निधी आक्रसू लागला. मात्र, आता पुन्हा परिस्थिती बदलताना दिसत आहे.