
गायत्री जगदाळे, contact@fund-matters.com
महागाई आणि मंदी हे दोन शक्तिशाली आर्थिक निर्देशक आहेत आणि ते जागतिक स्तरावर सर्व अर्थव्यवस्थांवर परिणाम करतात. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत होणारी वाढ ही महागाईचे प्रतीक आहे आणि त्यामुळे अनेकदा अर्थव्यवस्था नकारात्मक आर्थिक विकासाकडे किंवा मंदीच्या टप्प्याकडे ओढली जाते. हे दोन घटक अर्थव्यवस्थेला गुंतागुंतीचे बनवतात. या दोन घटकांविषयी सविस्तर माहिती देण्याचा हा प्रयत्न...
महागाई आणि मंदी हे दोन्ही वेगळे परंतु, आर्थिक संकल्पनांशी संबंधित घटक आहेत. महागाई म्हणजे किमतींमध्ये होणारी वाढ, तर मंदी म्हणजे आर्थिक मंदीचा काळ. मंदी म्हणजे आर्थिक घडामोडी आणि व्यवहारांमध्ये घट होणे, नोकरी गमावणे, व्यवसायातील गुंतवणूक कमी होणे वा ग्राहक खर्च कमी होणे होय. महागाई थेट मंदीला कारणीभूत नसली, तरी उच्च आणि सतत चलनवाढ मंदीला कारणीभूत ठरू शकते. महागाईमुळे पैशाची क्रयशक्ती कमी होते, याचा अर्थ ग्राहक समान रकमेने कमी वस्तू आणि सेवा खरेदी करू शकतात. उदा. एखाद्या ग्राहकाने एका महिन्यात किराणा मालावर १० हजार रुपये खर्च केले आणि त्याच किराणा मालाची किंमत पुढील महिन्यात ११ हजार रुपये असेल, तर ते किमतीत वाढ दर्शवते, याचा अर्थ ‘महागाई’ वाढली आहे.