
विक्रम अवसरीकर
vikram.awsarikar@gmail.com
जे करायचे नाही हे माहिती असेल, तर आपण आपोआपच योग्य गोष्ट करतो. त्याचप्रमाणे पैसे कसे गुंतवायचे नाहीत, याची माहिती असली, तर गुंतवणूक कशी आणि कुठे करायची, हे आपोआपच कळते. गुंतवणूक सल्लागार आणि अर्थविषयक लेखक बॅरी रिटहोल्त्झ यांनी लिहिलेल्या ‘हाऊ नॉट टू इन्व्हेस्ट’ या पुस्तकावर आधारित या विषयाची चर्चा करणारा हा खेळीमेळीचा संवाद...
न न न ना न न न ना...” धनंजयराव खुशीत शीळ घालत त्या हिरव्यागार कुरणातून चालले होते. बऱ्याच दिवसांत कामामुळे बाहेर पडता आले नव्हते; पण अचानक ऐन उन्हाळ्यात पावसाने वातावरण बदलले होते. धनंजयरावांनी शेवटी सुट्टी काढलीच. छोटूला बरोबर घेऊन ते एका थंड हवेच्या ठिकाणी गेले होते.
“काय अगदी नन्नाचा पाढा चाललाय वाटते?” छोटूने धनंजयरावांना इतके निवांत बऱ्याच दिवसांनी बघितले होते. त्यामुळे वातावरणात जरा रंग भरण्यासाठी त्याने टोकले.