
Mutual Fund Types Explained: Balancing Risk and Return with the Right Fund Choice
संध्याकाळचे पाच वाजून गेले होते; पण अजून हवेत उष्मा जाणवत होता. प्रतापरावांनी फ्रीजचा दरवाजा उघडून त्यातून पन्ह्याचा जार काढला. तेवढ्यात बेल वाजली. दारात धनंजयकाका उभे होते.
‘‘या, या काका. अगदी वेळेवर आलात.’’
‘‘का बरे? काही विशेष?’’ धनंजयकाकांनी विचारले.
‘‘काही नाही. कैरीचे पन्हे पिणार होतो त्यासाठी तुमची कंपनी मिळणार...’’ त्यांच्या हातात पन्ह्याचा ग्लास देऊन प्रतापराव म्हणाले.
‘‘प्रतापराव, तुम्ही म्हणता इक्विटी म्युच्युअल फंडात चांगला परतावा मिळतो म्हणून. माझ्या एका मित्राने दोन-तीन वर्षांपूर्वी एका म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले आहेत. शेअर बाजार वर गेला, तरी त्याच्या म्युच्युअल फंडाच्या मूल्यात फारशी वाढ झालीच नाही. हे कसे काय?’’ म्युच्युअल फंडाचे स्टेटमेंट प्रतापरावांच्या हातात ठेवून काकांनी विचारले.
प्रतापरावांनी स्टेटमेंटवर एक नजर टाकली.
‘‘अहो काका, तुमच्या मित्राने व्हॅल्यू फंडात गुंतवणूक केली आहे आणि तीही कंपनीने पहिल्यांदाच बाजारात युनिटची विक्री केली तेव्हा, म्हणजे न्यू फंड ऑफरच्या (एनएफओ) वेळी. त्यामुळे यावर परतावा मिळण्यासाठी जास्तीचा अवधी लागू शकतो.’’‘ ‘तो कशासाठी?’’‘ ‘काका, कंपनीने पहिल्यांदाच बाजारात युनिटची विक्री केली. त्यातून मिळणाऱ्या पैशांची विचारपूर्वक गुंतवणूक करायला थोडा वेळ जातो. तसेच सुरुवातीचा खर्चही असतो. व्हॅल्यू फंड अशा शेअरमध्ये गुंतवणूक करतो, ज्यांचा बाजारातील भाव आता कमी आहे; पण ती वर जाण्याची त्यांची क्षमता जास्त आहे. मूलभूतदृष्ट्या अशा शेअरचा भाव जास्त असला, तरी अशा शेअरवर शेअर बाजाराची मेहेरनजर झाली नाही. काही फंड व्यवस्थापक असे शेअर शोधून काढून त्यात गुंतवणूक करतात. यातील गुंतवणूक दीर्घकाळासाठी असते. यालाच मूल्याधारित गुंतवणूक असेही म्हणता येईल. अशा शेअरचा भाव कधी वाढेल याबाबत अनिश्चितता असते. अशा प्रकारचा फंड हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त नसतो. म्युच्युअल फंड हे एक साधन आहे; पण त्या साधनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक म्युच्युअल फंडाची जोखीम आणि परतावा हा वेगवेगळा असतो.’’