

Nifty 50: India’s Leading Stock Market Index
Sakal
ऋत्विक जाधव (तांत्रिक विश्लेषक )
शेअर बाजार
राष्ट्रीय शेअर बाजाराकडून (एनएसई) सादर करण्यात आलेला ‘निफ्टी ५०’ निर्देशांक हा भारतातील भांडवली बाजाराचा प्रमुख आणि विश्वासार्ह मानक (बेंचमार्क) निर्देशांक मानला जातो. देशातील सर्वांत मोठ्या, स्थिर आणि तरल अशा ५० आघाडीच्या कंपन्यांच्या कामगिरीचे प्रतिबिंब या निर्देशांकात दिसून येते. बँकिंग, आयटी, ऊर्जा, ग्राहक वस्तू, आरोग्यसेवा, वाहन, बांधकाम अशा एकूण १४ महत्त्वाच्या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व यामध्ये होते. आज भारताची अर्थव्यवस्था एका परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. वाढते दरडोई उत्पन्न, विस्तारत जाणारा मध्यमवर्ग, सरकारकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेली पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक, अनुकूल लोकसंख्यात्मक रचना आणि स्थिर आर्थिक धोरणे यामुळे देशाचा विकास वेगाने होत आहे. या सर्व घटकांचा थेट फायदा ‘निफ्टी ५०’ मधील कंपन्यांना होत असून, भारतीय कॉर्पोरेट नफ्याचा कणा म्हणून या कंपन्या उदयास येत आहेत.