
बी. एम. रोकडे
bmrokade@hotmail.com
मागील काही दिवसांपासून आमच्या बँक सेवानिवृत्तांच्या ग्रुपमध्ये एक मोठा विषय गाजतो आहे. आमच्यापैकी बहुतेकांच्या खात्यामध्ये अचानक एक रुपया जमा झाला आहे. सध्या सायबर स्कॅमच्या वेगवेगळ्या पद्धती उजेडात येत असल्याने या एक रुपयाचे काय गौडबंगाल आहे, याविषयी बहुतेकांच्या मनात साशंकता आणि भीती आहे.
ही पार्श्वभूमी लक्षात घेतल्यास बहुतेकांच्या खात्यामध्ये अचानक एक रुपया जमा होणे, ही अशीच फसवणुकीची काहीशी घटना असावी अशी शंका येणे साहजिकच आहे. मात्र, याबाबत माहिती घेतल्यानंतर असे लक्षात आले, की रिझर्व्ह बॅंकेने काही अकाउंट अॅग्रीगेटर कंपन्यांना ‘एनबीएफसी-एए’ हा परवाना प्रदान केला आहे.
त्यांपैकी परफियस अकाउंट अॅग्रीगेशन सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीने खात्यांची पडताळणी करण्याच्या उद्देशाने हा एक रुपया सर्वांना पाठवला आहे. ही १५ वर्षे जुनी अशी ‘बी२बी’ फिनटेक सॉफ्टवेअर कंपनी आहे. भारताची दुसरी युनिकॉर्न कंपनी असल्याचा मान तिच्याकडे जातो. अॅग्रीगेटर किंवा वित्तीय किंवा फायनान्शिअल कंपन्यांना ‘रिअल टाईम’ माहितीपूर्ण निर्णय घेण्यास ती मदत करते.