गुंतवणुकीची आयपीएल !

आपल्या पोर्टफोलिओमध्ये भरवशाच्या फलंदाजासारखा, एखादा गुंतवणूक पर्याय असणे महत्त्वाचे असते
Dr Virendra Tatke on investment in Crypto currency share market home
Dr Virendra Tatke on investment in Crypto currency share market homesakal
Summary

आपल्या पोर्टफोलिओमध्ये भरवशाच्या फलंदाजासारखा, एखादा गुंतवणूक पर्याय असणे महत्त्वाचे असते

यंदाच्या मोसमातील ‘आयपीएल’चे क्रिकेट सामने उत्साहात सुरू आहेत. सामन्यांमध्ये सर्वोत्तम फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, इमर्जिंग प्लेअर या ‘किताबां’विषयीही सर्वांना उत्सुकता असते. यामुळे त्या खेळाडूच्या कौतुकाबरोबरच पुढील ‘आयपीएल’साठी त्याचा ‘भाव’ही वाढतो.

गुंतवणुकीकडेदेखील ‘आयपीएल’च्या दृष्टीकोनातून पाहिल्यास असे लक्षात येते, की आपल्या पोर्टफोलिओत चांगले खेळाडू घेतल्यास आपल्या संघाची ‘आर्थिक ताकद’ नक्कीच वाढू शकते.

ऑरेंज कॅप - पीपीएफ

आपल्या पोर्टफोलिओमध्ये भरवशाच्या फलंदाजासारखा, एखादा गुंतवणूक पर्याय असणे महत्त्वाचे असते. अर्थव्यवस्थेची स्थिती कशीही असो, या खेळाडूने नियमितपणे, ठराविक परताव्याच्या रूपाने धावा करून दिल्या पाहिजेत. या फलंदाजांचा स्ट्राईकरेट फार आकर्षक नसेल; परंतु विकेट न गमावता सातत्याने धावा करण्याची क्षमता हवी. असा गुंतवणूकरुपी खेळाडू आहे ‘पीपीएफ’ अर्थात सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी. यात चक्रवाढव्याजाच्या लाभासह सुरक्षितता व प्राप्तिकर सवलतीचा फायदाही आपण घेऊ शकतो. थोडक्यात, हा ‘ऑरेंज कॅप’ किताब मिळवू शकणारा भरवशाचा खेळाडू आहे.

पर्पल कॅप - शेअर बाजार

उत्तम फलंदाजाप्रमाणेच कमीत कमी धावा देऊन जास्तीत जास्त बळी मिळवणाऱ्या गुंतवणूकरूपी गोलंदाजाचीही आपल्या संघात आवश्यकता असते. असा गोलंदाज गुंतवणुकीचे मैदान कसे आहे, याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे आपल्या पैशांचे क्षेत्ररक्षण करून विकेट काढतो. त्याच्यासमोर असलेल्या फलंदाजांचा तो सातत्याने अभ्यास करत असतो. त्याच्या उणीवा शोधून तो गोलंदाजी करतो व बळी मिळवतो. शेअर बाजार हा असा खेळाडू आहे. याचा अभ्यास करून योग्य संधी शोधून केलेली गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. मात्र यासाठी प्रयत्नांत आणि अभ्यासात सातत्य हवे.

व्हॅल्युएबल प्लेअर - फ्लॅटमधील गुंतवणूक

आपल्या संघाचे मूल्य कायम वाढवत राहील, असा खेळाडूही आवश्‍यक असतो. आर्थिक अस्थिरता आली, तरी अशा मौल्यवान खेळाडूचे मूल्य फारसे कमी होत नाही. अर्थात, असा खेळाडू तयार होण्यास दीर्घकाळ लागतो. शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेला सर्वसोयींनीयुक्त फ्लॅट हे याचे उत्तम उदाहरण आहे. अर्थव्यवस्थेत चढउतार आले, तरी फ्लॅटची मागणी कायम असते, ज्यामुळे त्यांचे बाजारमूल्य सातत्याने वाढत राहते.

इमर्जिंग प्लेअर - क्रिप्टो करन्सी

बाजारात गुंतवणुकीसाठी नवनवे पर्याय सातत्याने उपलब्ध होत असतात. यापैकी काही पर्याय आकर्षक दिसत असले, तरी त्यात मोठी जोखीमही असते. तर काही नवे पर्याय सर्व नियमांचे पालन करून चांगल्या परताव्याची खात्रीसुद्धा देतात. असाही एखादा खेळाडू आपल्या संघात असणे फायद्याचे ठरते. मात्र त्याला संघात घेण्याआधी आपले आधीचे खेळाडू, जोखीम घेण्याची संघाची तयारी याचा अभ्यास करावा. असा खेळाडू अपेक्षित ‘परतावा’ देऊ शकला नाही, तर संपूर्ण संघाला फटका बसू शकतो, हे लक्षात ठेवावे. उदाहरणार्थ, क्रिप्टो करन्सीसारख्या आभासी चलनात केलेली गुंतवणूक.

थोडक्यात, आपण संघमालकाच्या भूमिकेत जाऊन आपल्या संघात चांगल्या खेळाडूंची निवड केली, तर गुंतवणुकीच्या ‘आयपीएल’ सामन्यात आपला विजय नक्की आहे.

(लेखक इंदिरा ग्लोबल बिझनेस स्कूल या संस्थेत संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com