easy loan approved on online be alert
easy loan approved on online be alertSakal

झटपट कर्जाचा पाश

इतक्या सहज कर्ज मिळत असल्यामुळेही अनेक लोक आवश्‍यकता नसतानादेखील किंवा चैनीसाठी कर्ज घेण्याकडे वळत आहेत.

अचानक उद्‌भवणाऱ्या काही प्रसंगांमुळे आपल्याला तातडीने मोठ्या रकमेची गरज भासते. मात्र, त्या वेळी आवश्यक रक्कम शिल्लक नसेल, तर आपण नातेवाइक, मित्र यांच्याकडून ती रक्कम जमा करण्याचा प्रयत्न करतो; तेही शक्य झाले नाही, तर कठीण स्थिती निर्माण होते. कारण बँका किंवा सोसायटी यांच्याकडून तत्काळ कर्ज मिळत नाही.

अशा वेळी ऑनलाइन किंवा मोबाईल अॅपद्वारे मिळणारे तत्काळ कर्ज सोयीचे वाटते. अनेक खासगी वित्तीय कंपन्या असे तत्काळ कर्ज देत आहेत. हे कर्ज अक्षरशः एक ते दोन तासांच्या अवधीत मिळते, तेही कमीत कमी कागदपत्रे आणि विना जामीनदार.

इतक्या सहज कर्ज मिळत असल्यामुळेही अनेक लोक आवश्‍यकता नसतानादेखील किंवा चैनीसाठी कर्ज घेण्याकडे वळत आहेत. ही सुविधा सोयीची असली, तरी असे कर्ज घेताना खबरदारी घेणे गरजेचे आहे; अन्यथा हा कर्जाचा पाश घातक ठरू शकतो.

महत्त्वाच्या बाबी

सर्वप्रथम कर्ज देऊ करणारा ऑनलाइन प्लॅटफॉर्म विश्‍वासार्ह असल्याची खात्री करून घ्या. शक्यतो माहितीतील बिगरबँकिंग वित्तीय संस्थांच्याच ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा मोबाईल अॅपचा वापर करा. उदा. बजाज फायनान्स, महिंद्रा फायनान्स, श्रीराम फायनान्स, एल अँड फायनान्स आदी. अशा नावाजलेल्या कंपन्यांची माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असते; तसेच ‘आरबीआय’कडील त्यांच्या नोंदणीचीही माहिती मिळू शकते.

ऑनलाइन किंवा मोबाईल अॅपवर आपण देत असलेली माहिती सुरक्षित असणे आवश्यक असते; अन्यथा तिचा गैरवापर होऊ शकतो.

कर्जासाठीच्या अटी समजून घ्या व त्यांचे पालन आपल्याला करता येईल, याची खात्री करून घ्या. उदा. व्याजदर, परतफेडीचा कालावधी, मासिक हप्ता, लेट पेमेंट चार्जेस, प्रीपेमेंट चार्जेस, प्रोसेसिंग चार्जेस आदी.

आवश्यक तेवढेच कर्ज घ्या. सहज मिळतेय म्हणून जास्तीचे कर्ज घेऊ नका.

ज्या कंपनीकडून कर्ज घेत आहात, त्या कंपनीस प्रत्यक्ष अथवा ई-मेल, फोनद्वारे संपर्क करता येऊ शकतो याची आणि कस्टमर सपोर्ट सुविधा असल्याची खात्री करून घ्या.

फसव्या जाहिराती व प्रलोभनाला बळी पडून ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा मोबाईल अॅपवर कर्ज घेऊन मनस्ताप झाल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. अशा कंपन्यांद्वारे कर्जवसुलीसाठी दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याच्याही घटना घडल्या आहेत, त्यामुळे वेळीच योग्य दक्षता बाळगणे महत्त्वाचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com