Zero Percent Interest Loan : गौडबंगाल शून्य टक्के व्याजदराचे!

उन्हाळ्याचे दिवस आहेत. भाऊसाहेब कूलर घ्यायला गेले. कूलर होता आठ हजार रुपयांचा. विक्रेता म्हणाला, आमच्याकडे शून्य टक्के व्याजदरावर ‘एसी’ आहेत, बघणार का? बघायला काय हरकत आहे, असे म्हणून भाऊसाहेब ‘एसी’ बघायला गेले.
Zero Percent Interest Loan
Zero Percent Interest Loansakal

विक्रम अवसरीकर

फायनान्शियल प्लॅनर

उन्हाळ्याचे दिवस आहेत. भाऊसाहेब कूलर घ्यायला गेले. कूलर होता आठ हजार रुपयांचा. विक्रेता म्हणाला, आमच्याकडे शून्य टक्के व्याजदरावर ‘एसी’ आहेत, बघणार का? बघायला काय हरकत आहे, असे म्हणून भाऊसाहेब ‘एसी’ बघायला गेले. त्यांना ४० हजार रुपयांचा एक ‘एसी’ फारच आवडला, त्यात काहीही जास्तीचे पैसे न देता तीन वर्षांत ४० हजार रुपये फेडायचे होते. वहिनीसाहेब आणि बाळासाहेबांच्या आग्रहामुळे भाऊसाहेबांनी आठ हजारांऐवजी ४० हजार रुपयांचा ‘एसी’ घेतला. तापमानाचा पारा चाळिशीवर गेल्याने मस्त थंड वातावरणात झोपू, या बेबीताईंच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण कशात आपले हात अडकवून घेतले आहेत हे भाऊसाहेबांना कळले असते, तर ते ‘एसी’शिवाय थंड पडले असते, यात शंका नाही.

शून्य टक्के व्याजदर म्हणजे काय?

आपण घेतलेल्या वस्तूची किंमत, जी काही असेल ती कुठलेही व्याज न देता ठरावीक काळात परत करायची योजना कोणी घेतली, तर त्याला झिरो पर्सेंट लोन घेतले असे म्हणू शकतो. मुळात अशा योजना ज्या दुकानातून आपण वस्तू घेत आहोत ती दुकाने चालवत नाहीत, तर त्या दुकानाच्या जागेचा वापर करून बँक, कर्जाऊ रक्कम देणाऱ्या कंपन्या चालवत असतात. दुकानदारांबरोबर आधीच करार करून त्या वस्तू दुकानदाराला कमी किमतीत पडतील अशी व्यवस्था त्या कंपन्यांनी केलेली असते. त्यात आपल्याला पडायचे नाही, हा त्यांच्या धंद्याचा भाग झाला; पण शून्य टक्के व्याजदर या नावाखाली भाऊसाहेबांना प्रोसेसिंग फी, डॉक्युमेंट फी, योजना घेण्यासाठीची फी आणि कार्ड फी, अशी विविध प्रकारची फी म्हणून मोठी रक्कम मोजायला लागली. ही रक्कम त्या कर्जाच्या रकमेतून वजा होणार असल्याने भाऊसाहेबांना या योजनेखाली जास्त रकमेचे कर्ज घ्यावे लागले.

भाऊसाहेबांनी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अनेक सह्या केल्या, त्यांना त्यांचे आधार, मागच्या वर्षीच्या रिटर्नची कॉपी, बँक खात्याची माहिती द्यावी लागली. या योजना ठराविक गोष्टींनाच लागू होत्या, घासाघीस करून रक्कम कमी करणे नव्हतेच. ‘एसी’ घेतला; पण काहीच घासाघीस न करता घ्यावा लागला म्हणून वहिनीसाहेब जरा नाराज होत्या; पण ती नाराजी त्यांनी स्मार्ट वॉचसाठी घासाघीस करून, एवीतेवी व्याज काहीच द्यायचे नाही तर ते पैसे वापरू तरी या विचाराने खरेदी केले आणि बाळासाहेबांना सरप्राईझ दिले.

आनंदी बायको सुखी कुटुंब. बाळासाहेब पण खुश, ‘एसी’मुळे बेबीताईही खूश. फक्त बाळासाहेब जास्तीचा खर्च झाला म्हणून नाखूश. त्यांनी एखादा हप्ता चुकवला, तर त्यांना जी काही रक्कम दंड म्हणून भरावी लागली असती त्याची कल्पना त्यांना असती तर त्याच ‘एसी’च्या थंड हवेत निदान तास दोन तास त्यांना डोके धरून बसावे लागले असते.

अशा प्रकारच्या योजनांमध्ये नक्की काय आहे हे इतक्या बारीक अक्षरात लिहिले असते, की कोणीही ते वाचण्याच्या भानगडीत पडत नाही. वाढणाऱ्या उकाड्यामुळे आणि बायका-पोरांच्या हट्टामुळे गांजलेल्या भाऊसाहेबांनी अगदी थोडाच वेळ उपलब्ध असणाऱ्या, ज्यांची लायकी आहे त्यांनाच हा लाभ देणाऱ्या योजनेपुढे आणि विक्रेत्याच्या आग्रहापुढे नांगी टाकली. खिशात पैसे नसले, तरी गोष्टी सहजपणे उपलब्ध करून देणाऱ्या या योजनांचा काहीवेळा फायदा होतो; पण होऊ दे खर्च, असे म्हटले तर मात्र कठीण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com