Credit Card : क्रेडिट कार्डचा कार्यक्षम वापर

क्रेडिट कार्डाची मर्यादा पूर्णपणे वापरणे चुकीचे नसले, तरी यामुळे आपल्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो.
Credit Card
Credit CardSakal

आजकाल बहुतांश मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय लोक एक किंवा त्याहून अधिक क्रेडिट कार्ड वापरत असल्याचे दिसून येते. मात्र, यातील अनेकांना क्रेडिट कार्ड कसे वापरावे याबाबत फारशी माहिती नसते. कार्डाची पतमर्यादा कार्ड देतानाच ग्राहकाला सांगितलेली असते. ही मर्यादा कार्यक्षमपणे वापरण्याची माहिती असणे आवश्‍यक आहे.

क्रेडिट युटीलायझेशन रेशो

क्रेडिट कार्डाची मर्यादा पूर्णपणे वापरणे चुकीचे नसले, तरी यामुळे आपल्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. हे टाळावयाचे असेल, तर क्रेडिट युटीलायझेशन रेशो म्हणजे काय हे समजून घेऊन, त्यानुसार कार्डाचा वापर करणे महत्त्वाचे आहे.

क्रेडिट युटीलायझेशन रेशो म्हणजे आपल्याला देण्यात आलेल्या क्रेडिट मर्यादेच्या किती टक्के मर्यादा वापरली जाते, याचे प्रमाण. उदा, वैभव याच्याकडे एसबीआय कार्ड, एचडीएफसी व बॉब कार्ड अशी तीन क्रेडिट कार्डे आहेत.

या तीन कार्डांची मर्यादा अनुक्रमे तीन लाख, दोन लाख आणि दोन लाख अशी एकूण सात लाख रुपये इतकी आहे. आज एसबीआय कार्डवर १,२५,००० रुपये, एचडीएफसी कार्डवर ८७, ८०० रुपये, तर बॉब कार्डवर १,०५,००० रुपये असे एकूण ३ लाख १७ हजार ८०० रुपये इतके पेमेंट झाले आहे व एकूण क्रेडिट लिमिट सात लाख रुपये इतकी आहे.

यानुसार, वैभव याचा क्रेडिट युटीलायझेशन रेशो (३१७८००/७०००००)* १००= ४५.४ टक्के आहे. सकृतदर्शनी वैभव याने क्रेडिट कार्डवर केलेले पेमेंट एकूण मर्यादेच्या आत आहे. यामुळे यात काही फारसे वावगे आहे, असे त्याला वाटत नाही.

रेशो चांगला, तर सिबिल स्कोअर उत्तम

क्रेडिट युटीलायझेशन रेशो शक्यतो ३० टक्क्यांच्या आत असावा. हा रेशो सातत्याने जास्त असेल (उदा, ७०, ८०, ९० टक्के), तर याचा अर्थ आपली वृत्ती उधारीवर जगण्याची आहे व यातून आपण कर्जाच्या विळख्यात सापडू शकता. याचा सगळ्यात पहिला दुष्परिणाम म्हणजे सिबिल स्कोअर खराब होतो.

त्यामुळे तुम्ही कार्डाच्या बिलांचे पेमेंट वेळेत व पूर्णपणे करत असलात, तरीही गृह, वाहन किंवा शैक्षणिक कर्ज सिबिल स्कोअर समाधानकारक नसल्याने नाकारले जाते. थोडक्यात, सिबिल स्कोअर चांगला (७५०च्या वर) ठेवायचा असेल, तर क्रेडिट कार्ड वापरताना क्रेडिट युटीलायझेशन रेशो शक्य तेवढा कमी राहील, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. तो सातत्याने ३० टक्क्यांपर्यंत ठेवला, तर आपोआप सिबिल स्कोअरही चांगला होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com