Mutual funds : इक्विटी सेव्हिंग्ज योजना कोणासाठी?

इक्विटी सेव्हिंग्ज योजना या ओपन-एंडेड म्युच्युअल फंड योजना आहेत.
फंड
फंड sakal

इक्विटी सेव्हिंग्ज योजना या ओपन-एंडेड म्युच्युअल फंड योजना आहेत. ज्या शेअरशी संलग्न (इक्विटी) आणि रोखे संलग्न (डेट) मालमत्तेचे वाटप करतात. शेअरशी संलग्न गुंतवणुकीत घसरणीच्या जोखमींपासून बचाव करण्यासाठी आर्बिट्राजमध्ये गुंतवणूक करण्याची मुभादेखील या योजनेला आहे. नियमांनुसार, या योजनेच्या गंगाजळीतील किमान ६५ टक्के निधी शेअर आणि शेअर संलग्न साधनांमध्ये गुंतवला पाहिजे, तर रोखे संलग्न साधनांमध्ये किमान वाटप १० टक्क्यांपेक्षा कमी नसावे. अल्प ते मध्यम मुदतीची गुंतवणूक उद्दिष्टे असलेल्या गुंतवणूकदारांना या योजना आदर्श पर्याय देतात.

अल्प ते मध्यम जोखीम पर्याय

या योजना शुद्ध इक्विटी किंवा शुद्ध डेट फंड नाहीत. कमी ते मध्यम जोखीम सोसण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ते योग्य पर्याय आहेत. ज्या गुंतवणूकदारांना उच्च उत्पन्न मिळवायचे आहे आणि उच्च जोखीम घेण्याची इच्छा आहे, त्यांना या श्रेणीतील योजना आकर्षक वाटणार नाहीत. बाजारातील अस्थिरतेबद्दल चिंतित असलेले गुंतवणूकदार या श्रेणीत गुंतवणूक करू शकतात.

विशेषतः जे गुंतवणूकदार बँकेतील मुदत ठेवीसारखा परंपरागत गुंतवणुकीचा मार्ग अनुसरतात किंवा पुराणमतवादी दृष्टिकोनासह आवर्ती ठेवींमध्ये गुंतवणूक करतात, अशांना इक्विटी सेव्हिंग्ज योजनेचा पर्याय म्हणून विचार करता येऊ शकेल. यातून ते उच्च परतावा मिळवू शकतील. इतकेच नाही, तर नियमित डेट म्युच्युअल फंड योजना किंवा गुंतवणुकीच्या पारंपरिक मार्गांपेक्षा त्यांचा परतावा दर ते सरस राखू शकतील.

उदाहरणार्थ, ज्या गुंतवणूकदारांचे आर्थिक उद्दिष्ट दोन-तीन वर्षांच्या कालावधीत साध्य होण्यासारखे असेल आणि ते अवाजवी जोखीम घेण्याच्या स्थितीत नसतील, अशा गुंतवणूकदारांसाठी इक्विटी सेव्हिंग्ज योजना अत्यंत उपयुक्त ठरू शकते. कारण तिचे मालमत्ता वाटप आणि आर्बिट्राजच्या माध्यमातून घसरणीच्या जोखमीपासून बचावाची (हेजिंग) क्षमता गुंतवणूकदारांच्या पदरी अपेक्षित परताव्याचे माप देऊ शकतात.

अशाप्रकारे, अशा योजना गुंतवणूकदारांच्या दोन गटांसाठी योग्य आहेत. सर्वप्रथम, ज्यांचा पुराणमतवादी दृष्टीकोन आहे आणि जोखीम घटक जे तळाशी ठेवू इच्छितात त्यांच्यासाठी ही उपयु्क्त योजना आहे. शिवाय गुंतवणूकदारांचा आणखी एक संच असा आहे की ज्यांची आर्थिक उद्दिष्टे अल्पावधीत गाठली जाणार आहेत आणि कमावलेले घसरणीतून गमावण्याची जोखीम कमी करण्यासाठी हेजिंगसारख्या जोखीमरोधी धोरणांचा अवलंब करताना शेअर संलग्न गुंतवणुकीची वाढीची क्षमता ते गमावू इच्छित नाहीत, अशांसाठीदेखील हा आदर्श पर्याय आहे.

‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल’ची योजना

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इक्विटी सेव्हिंग्ज स्कीम, या श्रेणीतील एक प्रमुख योजना आहे. ही वर उल्लेख केलेल्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आणि समर्पक ठरू शकेल. ज्या व्यक्तींना स्थिरतेसाठी तडजोड न करता परताव्यात वाजवी वाढ हवी आहे, अशी मंडळी अल्प ते मध्यम मुदतीच्या गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक करण्यासाठी या योजनेचा विचार करू शकतात.

(लेखक ‘फिनीती’ या कंपनीचे प्रोप्रायटर आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com