
डॉ. दिलीप सातभाई - चार्टर्ड अकाउंटंट- सीए
‘एनपीएस’ वात्सल्य ही राष्ट्रीय पेन्शन प्रणालीअंतर्गत योगदान देणारी पेन्शन योजना आहे. पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे ही योजना नियंत्रित आणि प्रशासित केली जाते. मुलांना लहानपणापासूनच निवृत्तीसाठी बचत करण्यास प्रोत्साहित करून सक्षम करण्याच्या उद्देशाने १८ सप्टेंबर २०२४ रोजी ही योजना सुरू करण्यात आली. ही योजना पालकांना त्यांच्या अल्पवयीन मुलासाठी पैशांची बचत करण्याची सोय उपलब्ध करून देते. मुलाचे शिक्षण आणि इतर आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी हा निधी वापरता येतो. जेव्हा अल्पवयीन मुलगा १८ वर्षांचा होतो, तेव्हा खाते चालू राहील, जमा झालेल्या निधीसह मुलाच्या नावावर हस्तांतरित केले जाईल आणि ते एनपीएस-टियर-१ खाते ऑल सिटिझन मॉडेल किंवा इतर नॉन-एनपीएस योजना खात्यात हस्तांतरित केले जाईल. एक पेन्शनधारक समाज निर्माण करणे, ज्यामुळे मुलांना आर्थिक नियोजन आणि जबाबदारीचे मूल्य कळेल, हे याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. या योजनेत काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून, त्या एक एप्रिल २०२५ पासून लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२६-२७ आणि त्यानंतरच्या मूल्यांकन वर्षासाठी अंमलबजावणी केली जाईल.